शिकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता जिंकण्याची वेळ आली आहे, असे सांगत विराट कोहलीने नव्या विचारांच्या पर्वाचे रणशिंग फुंकले आहे. कसोटी संघाचा नियमित कर्णधार झालेल्या कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पहिले अभियान विश्वचषकात दमदार प्रदर्शन करणाऱ्या बांगलादेशविरुद्ध आहे.
एकमेव कसोटीसाठी भारतीय संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. मात्र भारताप्रमाणेच फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असणार आहे. शिखर धवन आणि मुरली विजय या दोघांवर भारताला भक्कम सलामी देण्याची जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शिखर धावांसाठी झगडत होता. त्यानंतर विश्वचषकात त्याने दिमाखदार कामगिरी केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. कसोटी संघाचा सलामीवीर म्हणून संघात स्थान पक्के करण्यासाठी मुरली विजयला मोठी खेळी करावी लागेल.
भारतीय संघाचा रनमशीन असलेल्या विराट कोहलीवर आता दुहेरी जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडणाऱ्या कोहलीला स्वत:च्या खेळाने संघासमोर उदाहरण सादर करावे लागेल. आयपीएल स्पर्धा सुरू असताना इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला भारतीय संघासाठी संयमी खेळी करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. जबरदस्त फॉर्मात असलेला अजिंक्य रहाणे भारतीय संघासाठी निर्णायक आहे. कसोटी पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अंतिम अकरांत स्थान मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. सहा फलंदाज, यष्टीरक्षक आणि चार गोलंदाज असे नियमित समीकरण राबवल्यास रोहितला संधी मिळू शकते.
फिरकीला साथ देणारी खेळपट्टी असल्याने रविचंद्रन अश्विनच्या जोडीला हरभजन सिंगला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वरुण आरोन आणि इशांत शर्मा यांच्यात संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे.
बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. कसोटी मालिकेत पहिली कसोटी अनिर्णीत राखण्यात बांगलादेशने यश मिळवले होते. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अनुभवी मुशफकीर रहिम आणि शकीब अल हसन यांच्यावर बांगलादेशची भिस्त आहे. मोमिनुल हक सातत्याने धावा करतो आहे. महमदुल्लाला संयमी खेळी करण्याची गरज आहे. गोलंदाजांमध्ये रुबेल हुसेन बांगलादेशचा हुकमी एक्का आहे. शुवगता होम, ताजिऊल इस्लाम यांनी रुबेलला साथ देण्याची गरज आहे. घरच्या मैदानावर, चाहत्यांचा पाठिंब्यासमोर शानदार कामगिरी करण्यासाठी बांगलादेशचा संघ सज्ज आहे.
विश्वचषकातील वादग्रस्त नोबॉल प्रकरणानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा हा पहिलाच सामना आहे.

संघ
भारत- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विन, वरुण आरोन, उमेश यादव, इशांत शर्मा, करण शर्मा, भुवनेश्वर कुमार.
बांगलादेश- मुशफकीर रहिम (कर्णधार), तमिम इक्बाल, अब्दुल हसन, इम्रुल केयस, जुबैर होसैन, लिट्टन दास, मोहम्मद शाहीद, मोमिनुल हक, नासिर हुसेन, रुबेल होसैन, शकीब अल हसन, शुवगता होम, सौम्या सरकार, ताजिऊल इस्लाम, महमदुल्ला.

२६व्या वर्षी कसोटी संघाचा नियमित कर्णधार होणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. गोलंदाजांना २० विकेट्स मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. पाच गोलंदाजांसह खेळणे मला आवडते. दोन ते तीन फलंदाजांनी मोठी खेळी केल्यास पाचशे धावांचा डोंगर उभा राहू शकतो. बहुतांशी खेळाडू बांगलादेशमध्ये यापूर्वीही खेळले असल्यामुळे खेळपट्टय़ांची त्यांना कल्पना आहे.
– विराट कोहली,
भारतीय संघाचा कर्णधार

संघ म्हणून आमची एकत्रित कामगिरी सुधारते आहे. भारतीय संघ बलाढय़ आहे. त्यामुळे आम्हाला ५०-५० टक्के संधी आहे. भारताकडे चांगले फिरकीपटू आहेत. आमच्या फलंदाजांनी फिरकीपटूंचा सक्षमपणे सामना केला तर ही कसोटी रंगतदार होऊ शकते. भारताविरुद्ध आम्ही कसोटी जिंकलेली नाही, पण तो इतिहास आहे. आम्हाला पाचही दिवस सातत्याने खेळ करावा लागेल.
– मुशफकीर रहीम,
बांगलादेशचा कर्णधार