ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये भारतीय संघ आजच्या सामन्यात अंतिम संघात कोणत्या अकरा खेळाडूंची निवड करणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असे कर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सध्याच्या टी२० विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघाच्या अंतिम अकरात पहिल्या चारमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे निश्चित खेळणार आहे. यष्टिरक्षक म्हणून कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आशिया चषकादरम्यान, कार्तिकने भारताचा पहिला-पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून सुरुवात केली, परंतु अष्टपैलू जडेजाच्या दुखापतीमुळे रोहितने डावखुरा ॠषभ पंतला संधी दिली. शेवटच्या षटकात मोठे फटके मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्तिकपेक्षा पंतला पहिले प्राधान्य मिळू शकते. जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली. अष्टपैलू म्हणून संघात निवड केलेल्या दीपक हुड्डाला आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली, पण गोलंदाजीत त्याचा अजिबात उपयोग झाला नाही.
हेही वाचा : मोहालीतील सामन्यात कशी असेल खेळपट्टी, किती होईल धावसंख्या जाणून घ्या पीच रिपोर्ट
भारतीय संघाच्या गोलंदाजी ताफ्यात जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या पुनरागमनामुळे ती अधिक मजबूत झाली आहे. बुमराह आणि हर्षल दोघेही दुखापतींमुळे २०२२ च्या आशिया चषकाला मुकले. आता तीन सामन्यांच्या टी२० मालिकेदरम्यान ठसा उमटवण्याचा ते प्रयत्न करतील. मोहम्मद शमीच्या जागी संघात आलेल्या उमेश यादवलाही भारतीय संघ संधी देऊ शकते. अक्षर व्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि आर. अश्विनसारखे फिरकीचे पर्याय आहेत. शेवटी कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड काय विचार करतात यावर सारं काही अवलंबून असेल.