भारताच्या जगज्जेत्या क्रिकेट संघाचं गुरुवारी संध्याकाळी मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. मरीन ड्राईव्हवर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रिकेट चाहते जमा झाले होते. मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ही विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी ओपन डेकच्या बसमधून भारतीय क्रिकेटपटूंनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा मनमुरादपणे स्वीकार केला. त्यांना अभिवादन केलं. पण यावेळी घडलेल्या एका प्रसंगामुळे काही क्षण का होईना, भारतीय क्रिकेटपटू घाबरले. विराटनं लागलीच रोहितला ही बाब लक्षात आणून दिली आणि रोहितनं त्यावर पुढाकार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं विजयी रॅलीमध्ये?

गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास टीम इंडिया विश्वचषकासह दिल्लीहून मुंबईत दाखल झाली. मुंबई विमानतळावरून ते मरीन ड्राईव्हवर पोहोचले. तिथून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंचा मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी क्रिकेटपटू विजयी रॅलीमध्ये ओपन डेक बसमधून निघाले. काही अंतरावर जाताच बाजूला दिसलेल्या एका दृश्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना काही क्षण धक्का बसला.

क्रिकेटपटूंची विजयी रॅली जात असताना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं छायाचित्र काढण्यासाठी एक चाहता थेट झाडावर चढून बसला होता. चिंतेची बाब म्हणजे हा चाहता त्या झाडाच्या एका फांदीवर अगदी टोकावर पालथा झोपून हातातल्या मोबाईलवर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचा फोटो काढण्यात मग्न होता. ही बाब सर्वात आधी यशस्वी जैस्वालला लक्षात आली. त्यानंतर विराट कोहलीनंही हा प्रकार पाहिला. क्रिकेटपटूंना त्या चाहत्याची चिंता वाटू लागली. विराट कोहलीनं लागलीच ही बाब कर्णधार रोहित शर्माच्या निदर्शनास आणून दिली.

यानंतर मुंबईकर रोहित शर्मानं आपल्या स्टाईलमध्ये त्या चाहत्याला झाडावरून खाली उतरायला सांगितलं. त्यापाठोपाठ इतरही क्रिकेटपटूंनी त्या चाहत्याला खाली उतरायला सांगितलं. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्यावर सोशल मीडियावर सूचक पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

रोड शोनंतर मरीन ड्राईव्हची कशी आहे परिस्थिती? चपलांचा ढीग अन्… VIDEO मध्ये पाहा क्वीन नेकलेसवरील सद्यस्थिती!

मुंबई पोलिसांचं आवाहन

दरम्यान, मुंबई पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये सूचक शब्दांत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. फोटो काढण्यासाठी क्रिकेट चाहत्याने केलेल्या मेहनतीसंदर्भात “या मेहनतीचे फळ घातक ठरू शकते” असं पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. “भारतीय क्रिकेट संघाविषयी असलेले प्रेम आम्ही समजू शकतो, पण ते असे व्यक्त करणे धोक्याचे ठरू शकते”, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india road show in mumbai man on tree for clicking photo viral video pmw