WTC 2023 Final India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला. परंतु, या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने १५१ धावांवर पाच विकेट्स गमावल्या होत्या.
त्यानंतर आजच्या दिवशी भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी करून भारताची शान राखली. रहाणेनं १२९ चेंडूत ८९ धावा केल्या. तसंच शार्दुल ठाकूरनेही अर्धशतकी खेळी करत ५१ धावांची खेळी केली. रविंद्र जेडजानेही ४८ धावांची खेळी करून भारताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. या धावांच्या जोरावर भारताने ६९.४ षटकात सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १७३ धावांची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २ विकेट्स घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सला टीम इंडियाच्या तीन फलंदाजांना बाद करण्यात यश आलं. तसच स्कॉट बोलॅंड, कॅमरून ग्रीनलाही दोन विकेट्स मिळाल्या. तर नेथन लायनला एका विकेटवर समाधान मानावे लागलं. ऑस्ट्रेलियाच पहिला डाव संपल्यानंतर भारताने टी ब्रेकआधी पहिल्या १० षटकात ३७ धावा फलकावर लावल्या. मात्र, कर्णधार रोहित शर्मा (१५) आणि शुबमन गिल (१३) धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद केलं. तर तर गिल स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. भारताच्या पहिल्या इनिंगच्या १९ व्या षटकात मिचेल स्टार्कने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. चेंडूने उसळी घेतल्यानं विराट कोहलीने त्या चेंडूवर सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू बॅटला लागून दुसऱ्या स्लिपच्या दिशेनं गेला आणि विराट झेलबाद झाला.