Rohit Sharma Press Conference Before WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची सुरवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात हा मुकाबला रंगत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. परंतु, या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं संपूर्ण लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याकडे आहे. आम्ही यापूर्वी झालेल्या आयसीसी इव्हेंट्समध्ये काय झालं, याबाबत विचार करत नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. रोहितने पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं. भारताने मागील अनेक वर्षांपासून एकही आयसीसी टूर्नामेंट जिंकली नाही, या गोष्टीचा भारतीय संघ आणि खेळाडूंवर अतिरिक्त दबाव आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, नाही! आम्हाला माहित आहे की, आम्ही काय जिंकलं आहे आणि काय नाही.

नक्की वाचा – WTC फायनलआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी घोषणा, म्हणाला, “कर्णधारपद सोडण्याआधी…”

“पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. मागील वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हाही आम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हाही मी असंच उत्तर दिलं होतं. खेळाडूंना माहित आहे की टीम इंडियाने काय जिंकलं आहे काय नाही, त्यामुळे याबाबत सतत विचार करणं, मला वाटतं चूकीचं ठरेल.

तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल की, आता परिस्थिती काय आहे आणि आम्ही कोणती गोष्ट चांगली करू शकतो. सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफचं लक्ष फक्त आता होणाऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करून जिंकता येईल याकडे आहे. ज्या गोष्टी घडल्या आहेत आणि भविष्यात होणार आहेत, त्याबद्दल विचार करणं उचित ठरणार नाही. सध्याच्या घडीला काय चाललं आहे, याचा विचार करणं योग्य ठरेल. हा सामना कसा जिंकता येईल याकडेच आमचं संपूर्ण लक्ष आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india skipper rohit sharma explained why indian cricket team lost in icc tournaments since a decade india vs australia wtc final 2023 nss