IND vs AUS: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज असून शुक्रवारी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामन्यात विजयी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकले जाईल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
यादरम्यान टीम इंडियासोबत एक मोठा वेगळाच किस्सा घडला आहे. भारतीय संघ दोन दिवस अगोदरच दिल्लीत पोहोचला होता आणि मुख्य दिल्लीत हॉटेलमध्येही आधीच बुकिंग झाले होते, मात्र अचानक संघाचे हॉटेल बदलण्यात आले आणि भारतीय संघ आता दिल्लीहून थेट नोएडाला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघातील खेळाडूंना यावेळी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली नाही. त्यामागील कारण म्हणजे G20 शिखर परिषद आणि लग्नाचा हंगाम त्यामुळे पंचतारांकित हॉटेल्स आधीच बुक करण्यात आली होती. बीसीसीआयला शेवटच्या क्षणी खेळाडूंना इतरत्र सामावून घेण्याची योजना आखावी लागली.
विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट संघ सहसा दिल्लीतील ताज पॅलेस किंवा आयटीसी मौर्य येथे मुक्काम करतो, परंतु यावेळी ते नोएडाजवळील हॉटेल लीला येथे थांबावे लागले आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला याची पुष्टी दिली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “हॉटेल लीलामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा चांगल्या आहेत. अपरिहार्य कारणांमुळे बदल करण्यात आले आहेत. खूप विचार करून हॉटेल इथे शिफ्ट करायचं ठरवलं.”
विराट कोहलीबद्दलचे हे अपडेट
विराट कोहली संघासोबत राहत नसला तरी तो गुरुग्राममध्ये राहत आहे. कोहलीने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी गुरुग्राममधील त्याच्या घरी राहणे पसंत केले. त्याने संघ व्यवस्थापनाची परवानगीही घेतली आहे. भारत दिल्लीत बऱ्याच दिवसांनी कसोटी सामना खेळत आहे. कोहली दिल्ली-एनसीआरमध्ये आपला वेळ एन्जॉय करत आहे आणि तो लाँग ड्राईव्हवरही गेला होता.
विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये आपला जुना फॉर्म परत मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत असून सरावासाठी तो दिग्गज राहुल द्रविडकडे वळला आहे. नागपुरातील पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून कोहलीची कामगिरीही अत्यंत निराशाजनक होती आणि त्याने स्लिपमध्ये काही झेल सोडले. अशा स्थितीत त्याने द्रविडसह क्षेत्ररक्षण विभाग सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहली आज टीम हॉटेलमध्ये चेक इन करण्याची शक्यता आहे.
दिल्लीत टीम इंडियाचा विजय निश्चित!
भारतीय संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे दिल्लीतील विजय निश्चित मानला जात आहे. असो, दिल्ली हा एक प्रकारे भारतीय संघाचा अभेद्य किल्ला राहिला आहे. पाहिलं तर १९८७ पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. भारताने दिल्लीत ३४ कसोटी सामने खेळले आहेत, १३ जिंकले आहेत आणि फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण ७ कसोटी सामने खेळला असून १९५९ नंतर त्यांना येथे एकही सामना जिंकता आला नाही.