भारतीय संघातील खेळाडूंना क्रिकेट साहित्य पुरवणारी NIKE ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीम इंडियातील अनेक खेळाडुंनी NIKE कडून सध्या त्यांना देण्यात आलेल्या कीटचा दर्जा निकृष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) NIKE विरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी यासंदर्भात ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बातचीच केली. त्यांनी म्हटले की, आम्ही लवकरच यासंदर्भात NIKE कंपनीशी बोलणार आहोत. त्यासाठी बैठकीची वेळही निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत हा प्रश्न सुटेल, अशी आशा जोहरी यांनी व्यक्त केली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर नेमलेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीला नाईकेच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. त्यावेळी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी क्रिकेट साहित्याच्या निकृष्ट दर्जाविषयी चिंता व्यक्त केली होती.
अनुपचं स्वप्न साकार, क्रिकेटला मागे टाकत कबड्डी पहिल्या क्रमांकाचा खेळ!
NIKE ही कंपनी २००६ पासून टीम इंडियाला क्रिकेट साहित्य पुरवत आहे. भारतीय संघाच्या ‘कीट’चं प्रायोजकत्व मिळवण्यासाठी दर पाच वर्षांनी बीसीसीआय करार करतं. २००५ सालापासून भारतीय संघाच्या कीटचे प्रायोजकत्व NIKE याच कंपनीकडे आहे. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या करारानुसार या प्रायोजकत्वासाठी NIKE ने तब्बल ५.७ कोटी डॉलर्स मोजले होते.
भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून तिथून परतल्यानंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो. सध्या या दौऱ्यातील एकदिवसीय सामने सुरू असून पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद १३२ धावांची तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने नऊ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला.