एकदिवसीय क्रिकेटमधून सचिन तेंडुलकरने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त करताना सचिन म्हणाला की, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी मी मनाने संघाबरोबरच आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की, पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल.
एकदिवसीय संघाबरोबर सध्या मी नाही, पण मी मनाने नेहमीच त्यांच्याबरोबर आहे. माझ्या प्रत्येक वेळी संघाला पूर्णपणे पाठिंबा असेल. मला पूर्णपणे विश्वास आहे की, भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन करेल, असे सचिन म्हणाला.
निवृत्ती जाहीर केल्यावर सचिन कुटुंबीयांसह मसुरीला सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. त्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी त्याने प्रसारमाध्यमांशी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या सर्वाकडूनच संघाला शुभेच्छा आणि पाठिंब्याची गरज आहे. आपण जर त्यांना चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर नक्कीच त्यांच्याकडून चांगली कामगिरी होऊ शकेल, असे बोलतानाच सचिनने देशवासीयांना नूतन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की, २०१३ या नवीन वर्षांला सुरुवात झाली आहे आणि देशवासीयांना हे वर्ष आनंदाचे आणि सुदृढ आरोग्याचे जावो.
२३ वर्षांच्या कारकीर्दीत पाठिंबा दिलेल्या चाहत्यांचे सचिनने यावेळी आभार मानले. गेल्या २३ वर्षांच्या कारकीर्दीचा प्रवास अद्भुत असाच होता, हे सर्व तुम्हा चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले, त्यामुळे तुमचे आभार. कारकीर्दीमध्ये बरेच चढ-उतार आले आणि यावेळी चाहत्यांचा मला नेहमीच पाठिंबा मिळाला, माझ्यासाठी हे अनमोल असेच आहे. माझ्यासाठी हा प्रवास अविस्मरणीय असाच होता, त्यामुळे तुम्हा सर्वाचेच आभार, असे सचिन म्हणाला.
कुटुंबीयाबरोबर सुट्टीविषयी सचिनला विचारले असता तो म्हणाला की, गेल्या २३ वर्षांमध्ये क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे कुटुंबीयांना जास्त वेळ देता आला नाही. मी त्यांच्याबरोबर फारच कमी वेळ व्यतित केला. इथे आल्यावर मोठी रपेट मारल्यावर आपला देश आणि ही जागा किती नितांतसुंदर आहे, याची नव्याने जाणीव झाली. मला इथे कुटुंबीयांबरोबर मनमोकळेपणाने वेळ व्यतित करण्यात आला, यासाठी मी प्रसारमाध्यमांचे आभार मानतो. इथे मी बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि टेनिसच्या चेंडूने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
सचिन पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांच्याबरोबर २३ डिसेंबरपासून येथील उत्तर भारतीय रिसॉर्टमध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आला आहे.

Story img Loader