विश्वचषकाची स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ३० मे पासून इंग्लंडमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी या महत्वाच्या स्पर्धेसाठी आपला अंदाज वर्तवला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहचेल असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाला धक्का, झाय रिचर्डसन विश्वचषक संघातून बाहेर

“भारतीय संघ सर्वोत्तम ४ संघांपैकी एक असेल यात वाद नाही. मात्र यानंतर कोणता संघ बाजी मारेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे.” कपिल देव दिल्लीतील एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे दोन्ही संघही उपांत्य फेरीपर्यंत पोहचतील असा अंदाज कपिल देव यांनी वर्तवला आहे. याव्यतिरीक्त न्यूझीलंड आणि विंडीजचा संघ या स्पर्धेत सरप्राईज फॅक्टर ठरू शकतो असंही कपिल देव म्हणाले.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार या भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या खेळपट्ट्या चांगली साथ देतील. त्यामुळे या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली विंडीजवर मात करत पहिला विश्वचषक जिंकला होता. यानंतर २०११ साली धोनीच्या भारतीय संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेवर मात करुन पुन्हा एकदा विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे विराट कोहलीचा भारतीय संघ यंदा कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader