Border-Gavaskar Trophy: एक काळ असा होता जेव्हा विराट कोहली हार्दिक पांड्याबद्दल म्हणाला होता की, “बेन स्टोक्स कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी जे करत आहे ते पांड्या भारतासाठी करू शकत नाही याचे त्याला कोणतेही कारण दिसत नाही.” कोहलीही बरोबर होता कारण स्टोक्सनंतर जगात उदयास आलेला दुसरा अस्सल अष्टपैलू हार्दिक होता आणि केवळ प्रतिभेच्या आधारावर बोलायचे झाले तर तत्कालीन कर्णधाराचा आत्मविश्वास अगदी बरोबर होता. पण त्यावेळी कोहलीला एक गोष्ट माहीत नव्हती ती म्हणजे हार्दिकची येऊ घातलेली दुखापत ज्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या अत्यंत धोकादायक फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात हार्दिक पांड्याने फलंदाजी करताना १७ चेंडूत ३० धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजीत धुमाकूळ घातला आणि ४ षटकात १६ धावा देत ४ बळी घेतले. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चमकदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला ‘मॅन ऑफ द सीरीज’ म्हणून गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हार्दिक पांड्या खेळणार का?
गोलंदाजी आणि फलंदाजीतील हार्दिक पांड्याची झंझावाती कामगिरी पाहून चाहते त्याच्या कसोटी संघात पुनरागमनाची वाट पाहत आहेत, ज्याबाबत खुद्द हार्दिक पांड्याने एक मोठे अपडेट दिले आहे. हार्दिक पांड्याने त्याची शेवटची कसोटी २०१८ साली इंग्लंडविरुद्ध साउथहॅम्प्टनमध्ये खेळली होती. हार्दिक पांड्यावर २०१९ मध्ये शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून तो भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे.
हार्दिक पांड्याने कसोटी पुनरागमनाबाबत दिले मोठे अपडेट
भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याबाबत हार्दिक पांड्या म्हणाला, ‘मला जेव्हा वाटेल की माझ्यासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची योग्य वेळ आली आहे तेव्हा मी भारतीय कसोटी संघात परतेन. सध्या, मी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे, जे महत्त्वाचे आहे.” हार्दिक म्हणाला की, “आगामी २०२३ एकदिवसीय विश्वचषक आणि २०२४ टी२० विश्वचषक पाहता त्याचे संपूर्ण लक्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर आहे.”
२९ वर्षीय अष्टपैलू हार्दिक पांड्या हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु अलीकडेच श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या या खेळाडूने सांगितले की, तो डाव हाताळण्यास शिकला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात जशी भूमिका बजावत असे तशीच त्याला बजावायला आवडेल. धोनी हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो आणि हार्दिकचा असा विश्वास आहे की आता महान यष्टिरक्षकाची जागा एक फलंदाज म्हणून घेणे ही त्याची जबाबदारी आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तो आपला स्ट्राइक-रेट कमी करण्यास तयार आहे.