Sunil Gavaskar on India vs Pakistan Match: भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, “पाकिस्तानकडे खेळातील सर्वोत्तम नवीन चेंडूवर स्विंग करणारे गोलंदाज आहेत.” भारताचा १० सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. सध्या सुरू असलेला आशिया कप २०२३मधील सर्व सामने हे कोलंबोमध्ये रंगणार आहेत.र सुपर-४ टप्प्यातील पाकिस्तानविरुद्धच्या लढाईसाठी टीम इंडिया सज्ज आहे. रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून उभय संघांमधील हा सामना रंगणार आहे.
इंडिया टुडेशी बोलताना लिटल मास्टर गावसकर म्हणाले की, “पाकिस्तानकडे नेहमीच जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज तयार झालेले आहेत. आताही या संघात अप्रतिम गोलंदाज आहेत, जे हा नवा चेंडू स्विंग करून विरोधी संघाला धक्के देण्यास सज्ज असतात. पाकिस्तानचे वेगवान त्रिकूट शाहीन शाह आफ्रिदी (७), नसीम शाह (७) आणि हारिस रौफ (९) यांनी सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.”
गावसकर पुढे म्हणाले, “एखाद्या वेळी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान कदाचित नंबर १ आणि नंबर २ आयसीसी क्रमवारीत एकत्रितरित्या सीट शेअर करतील. हे सांगण्याचे कारण म्हणजे, पाकिस्तानकडे नेहमीच उच्च-श्रेणीचे नवीन डावखुरा आणि उजव्या हाताचे असे दोन्ही प्रकारचे गोलंदाज आहेत. परंतु या क्षणी, त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम घातक नवीन चेंडूवर विकेट्स घेणारे आक्रमण गोलंदाज आहेत.”
माजी खेळाडू गावसकरांनी भारतीय फलंदाजांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाविरुद्ध चांगली फलंदाजी करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. आशिया चषक २०२३च्या गट-टप्प्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी विरोधी संघांच्या सर्व १० विकेट्स घेतल्या आहेत. त्यात नेपाळ, भारत आणि बांगलादेश या सर्वबाद केले आहे. त्यांनी भारताला गट फेरीत टीम इंडियाला २६६ धावांत गुंडाळले. पाकिस्तानच्या गोलंदाजांविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी ऑफस्टंप पाहून फलंदाजी करावी. पहिले १० षटके टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे.”
सुनील गावसकर भारतीय फलंदाजीबाबत पुढे म्हणाले, “पाकिस्तानकडे डाव्या आणि उजव्या हाताचे कॉम्बिनेशन असणारे गोलंदाज आहेत. ते चेंडू दोन्ही बाजूंनी चांगल्या गतीने स्विंग करू शकतात. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक होणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नसते. खराब चेंडू पाहून चौकार-षटकार मारले पाहिजेत आणि जर भारतीय फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली तर त्यांना गोलंदाजी करणे अवघड होईल. एकाच फलंदाजाला अधिक चेंडू खेळावे लागणार नाहीत.”