India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु झालीय. मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रंगला. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणत धावसंख्येचा आलेख सर्वबाद १८८ धावांवर रोखला. भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १८९ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पण भारताच्या फलंदाजांनी सावध खेळी करत कांगारुंची दमछाक केली आणि ऑस्ट्रेलीयाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. ३९. ५ षटकात भारताने १९१ धावांचा डोंगर रचून ५ गडी राखत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.
भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज इशान किशन, शुबमन गिल,विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. पण पण कर्णधार हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने टीम इंडियाची कमान सांभाळली. परंतु, स्टॉयनीसच्या गोलंदाजीवर पांड्या बाद झाला आणि भारताला पुन्हा मोठा धक्का बसला. अशा परिस्थितीत के एल राहुलने सावध खेळी करून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. राहुलने ९१ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी साकारली. तर रविंद्र जडेजाने ६९ चेंडूत ४५ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी रचलेल्या शतकी भागिदारीमुळं भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला.
के एल राहुल आणि रविंद्र जडेजाने भारताच्या पाच विकेट्स गेल्यानंतर मैदानात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना समाचार घेतला. दोघांनाही धावसंख्येचा आलेख चढता ठेवताना विकेट जाणार नाही याची काळजी घेतली. टीम इंडियाच्या सलामीसाठी मैदानात उतरलेल्या इशान किशन आणि शुबमन गिल जोडीला मोठी धावसंख्या रचता आली नाही. पण के एल राहुलने टीम इंडियाची कमान सांभाळली. इशानने ३, गिलने ३१ चेंडूत २०, विराट कोहली ४, तर सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३१ चेंडूत २५ धावांची खेळी केली.