आयपीएल २०२१ आणि टी-२० वर्ल्डकप २०२१ नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत घरच्या मालिकांचे वेळापत्रक ठरवले आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताला भेट देतील. हे सर्व देश टीम इंडिया विरुद्ध भारतात ४ कसोटी, ३ एकदिवसीय आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होतील.
न्यूझीलंडचा भारत दौरा (नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१)
या मालिकांची सुरुवात न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यापासून होईल. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. किवी संघ जयपूर, रांची, कोलकाता येथे अनुक्रमे १७, १९, २१ नोव्हेंबर रोजी तीन टी-२० सामने खेळेल आणि अनुक्रमे २५ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबरला कानपूर आणि मुंबई येथे दोन कसोटी सामने खेळले जातील.
वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचा भारत दौरा (फेब्रुवारी ते मार्च २०२२)
न्यूझीलंडनंतर वेस्ट इंडिजचा संघ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर विंडीज संघ ३ टी-२० आणि ३ वनडे खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा भारत दौरा ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २० फेब्रुवारीला खेळला जाईल. वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भाग घेईल आणि त्यानंतर ३ टी-२० सामने आयोजित केले जातील. भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरू आणि मोहालीमध्ये दोन कसोटी सामने खेळले जातील आणि १३ मार्चपासून ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही मालिका आयोजित केली जाईल.
हेही वाचा – काय सांगता..! विराटची अलिशान कार होऊ शकते तुमची; ‘इतकी’ रक्कम भरा आणि गाडी घेऊन जा
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (जून २०२२)
श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका खेळल्यानंतर, आयपीएल २०२२ सुरू होईल आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ जूनमध्ये भारताच्या दौऱ्यावर येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. मालिकेची सुरुवात ९ जूनला पहिल्या टी-२० सामन्याने होईल आणि शेवटचा सामना १९ जूनला खेळला जाईल. भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल २०२१ ते जून २०२२ पर्यंत खूप व्यस्त राहणार आहेत. अशा स्थितीत, एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये जाणे सर्व खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल.