Shreyanka Patil ruled out of Womens Asia Cup 2024 due to injury : भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेचे यजमानपद असलेल्या टी-२० आशिया चषकात खेळत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा सामना ७ विकेट्सनी जिंकला. आता भारतीय संघाला ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलच्या रूपाने मोठा धक्का बसला असून ती बोटाला फ्रॅक्चर झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. टीम इंडियाला आपला पुढील सामना २१ जुलै रोजी यूएई संघाविरुद्ध खेळायचा आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयंका पाटीलला दुखापत झाली होती –
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयंका पाटीलला झेल घेताना दुखापत झाली होती. श्रेयंकाच्या डाव्या हाताच्या सर्वात लहान बोट करंगळी फ्रॅक्चर झाली होती, मात्र तरीही तिने या सामन्यात गोलंदाजी सुरूच ठेवली. तिने ३.२ षटकात केवळ १४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. श्रेयंकाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानला १०८ धावांवर गुंडाळले होते.
आशियाई क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयंकाच्या जागी बदली खेळाडूचे नावही जाहीर करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातही तिच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. यानंतर ती आरसीबी संघाससाठी काही सामने खेळू शकला नव्हती. मात्र, नंतर तिन पुनरागमन करत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
श्रेयंका पाटीलच्या जागी तनुजा कंवरला संधी –
महिला टी-२० आशिया कपच्या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलेल्या श्रेयंका पाटीलच्या जागी, २६ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज तनुजा कंवरला स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे. तनुजा ही महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व करते. तिने दुसऱ्या सत्रात तिच्या संघासाठी सर्वाधिक १० विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय, ती भारत अ महिला संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सदस्य आहे.