क्रिकेट हा खेळ वर्षांनुवष्रे टेलिव्हिजनवर दाखवला जातो आणि क्रीडारसिक त्याचा मनमुराद आनंद लुटतात. कबड्डी हा खेळ टीव्हीवर कधीच नियमितपणे दाखवला गेला नव्हता. त्यामुळे प्रो कबड्डी लीग अस्तित्वात आल्यानंतर या खेळात क्रांतीचे वारे वाहू लागले. १३ बाय १० फुटांच्या मैदानावर अतिशय वेगाने घटना घडत जातात. दर ३० सेकंदांत नवे नाटय़ मैदानावर घडत असते. पहिल्या दोन हंगामांमध्ये मैदानावरील कोणताही ध्वनी टिपला गेला नव्हता. मात्र तिसऱ्या हंगामात खेळाडू, पंच, झटापटी यांचे ध्वनी टिपले जाऊ लागले आहेत. आवाजाच्या आणि चित्रणाच्या माध्यमातून अधिक सशक्त पद्धतीने कबड्डी क्रीडारसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मॅटखालील माइक, खेळाडूंना माइक आणि रेफरी
कॅम-माइक हे प्रयोग करण्यात आले आहेत.
सात क्षेत्ररक्षक आणि एक चढाईपटू यांच्यातील द्वंद्व म्हणजे कबड्डी. कबड्डीतील प्रत्येक चढाई म्हणजे एक कथा असते. एक नायक आहे आणि त्याला कोंडीत पकडण्यासाठी सात अन्य खलनायक हेच त्याचे कथासूत्र. हा खेळ आलटून-पालटून एकाच अध्र्या भागात होतो. त्यानुसार दोन हंगामांमध्ये कॅमेरे आणि ध्वनींची योजना तयार करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात ‘कबड्डी.. कबड्डी’ बोलणे हे कबड्डीपटूला अनिवार्य आहे आणि हा आवाजसुद्धा आता लोकांना टीव्हीवर ऐकायला येत आहे. याशिवाय स्लो मोशन, अल्ट्रा मोशन, अल्ट्रा स्लो मोशन या माध्यमातून प्रत्येक झटापटीकडे बारकाईने पाहता येऊ लागले आहे.
खेळातील प्रत्येक क्रियेचा एक ध्वनी असतो. क्रिकेटमध्ये चेंडूला बॅटने फटकवण्याचा ध्वनी. टेनिसमध्ये रॅकेटने चेंडू फटकावणे हे खेळाचे ध्वनी आहेत. कबड्डीचा ध्वनी अद्याप लोकांपर्यंत पोहोचला गेला नव्हता. मागील हंगामात संयोजकांनी मैदानावर माइक लटकवले होते. पण प्रेक्षकांच्या जल्लोषात मैदानावरील आवाज योग्य रीतीने टिपले गेले नाहीत. रग्बी या धसमुसळ्या खेळात कशा प्रकारे खेळातील ध्वनी लोकांपर्यंत पोहोचला जातो, याचा संयोजकांनी अभ्यास केला. त्यानंतर खेळाडूंच्या जर्सीत बसू शकतील असे माइक विकसित करण्यात आले. त्यामुळे आता ‘कबड्डी.. कबड्डी’ हा ध्वनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
क्रिकेटसाठी खास मैदाने बनवली गेलेली नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर प्रकाशझोतासाठी मनोरे बनवले गेले असल्यामुळे स्पायडर कॅम बसवणे सोपे असते. कबड्डीसाठी खास स्टेडियम उपलब्ध नाहीत. जे वापरले जात आहेत, त्यात विद्युतरचनासुद्धा करण्यात आली आहे. कबड्डीसाठीचे स्टेडियम बनवले गेल्यास ते शक्य होईल, असा आशावाद संयोजकांकडून प्रकट करण्यात आला.
मॅटखालील माइक : मॅटच्या मैदानाखाली एकंदर २० माइक बसवण्यात आले आहेत. यापैकी दोन लॉबीच्या खाली बसवण्यात आले आहेत. पायांचे चापल्य, मांडीवरची थापट, कुणी पडत असेल, झटापटीच्या क्षणीचे संवाद हे सारे टिपण्याचे कार्य हे माइक करतात.
खेळाडूंचे माइक : ५० ग्रॅम वजनाचा रबराच्या आवरणातील हा लवचीक माइक प्रत्येक खेळाडूच्या जर्सीत कॉलरच्या खाली विशिष्ट पद्धतीने बसवण्यात आला आहे. यासाठी हलक्या तारेचा वापर करून खेळताना तो पडणार नाही, अशा रीतीने त्याची रचना करण्यात आली आहे. खेळाडू झटापट करताना पडला तरी त्याला अपाय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
रेफरी कॅम-माइक : मैदानावरील एखादा निर्णायक क्षण टिपण्यासाठी, पंचाचा एखाद्या निर्णय किंवा एखाद्या निर्णयावर तिसऱ्या पंचाकडे मागितलेली दाद हे पंचांच्या नजरेतून कसा दिसेल, हे रेफरी कॅम टिपतो. याचप्रमाणे पंचांनी दिलेले निर्णय तिसऱ्या पंचांकडे मागितलेली दाद या साऱ्या गोष्टी आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.