सचिन तेंडुलकरनं गौरवलेल्या १६ वर्षांखालील मुंबई संघाचा कर्णधार मुशीर खान याच्यावर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली आहे. डिसेंबर २०१८मध्ये विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीदरम्यान आक्षेपार्ह वर्तन करण्यात आल्यामुळे मुशीरवर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी मुशीर खानविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर एमसीएने मुशीरवर तीन वर्षांच्या बंदींचा निर्णय घेतला. १५ जानेवारी २०१९ ते १४ जानेवारी २०२२पर्यंत मुशीरवर बंदी असणार आहे. एमसीएने मुशीर खानला पत्र पाठवून त्याच्यावर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुढील तीन वर्षांसाठी मुशीरला मुंबई क्रिकेट असोसिएशन स्पर्धा आणि बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.
एमसीएने मुशीरला लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, हंगामी कार्यकारिणीला तो दोषी असल्याचे आढळले आहे आणि त्यामुळे संघटनेची बदनामी झाली आहे. संघाचा कर्णधार या नात्याने जबाबदारी पूर्ण करण्यात तुला अपयश आले. या वर्तनामुळे संघाला धक्का बसला आणि त्यांच्यावर परिणामही झाला.
२०१३ मध्ये मुशीर खानला ज्युनियर क्रिकेटरने सन्मनित केले होते. सचिन तेंडुलकरने प्रतिभावान मुशीर खानचा सन्मान केला होता. क्रिकेटमध्ये हा खूप पुढे जाईल असे सचिन तेंडुलकरने म्हटले होते. मात्र, मुशीर खानवर एमसीएने आता ३ वर्षाची बंदी घातली आहे.