दीपक निवास हुडाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सचा ३२-३० असा पाडाव करून प्रो कबड्डी लीगमध्ये गुरुवारी तिसऱ्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली.
नेताजी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी बंगाल वॉरियर्सने पहिल्या सत्रात १६-१० अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी यजमान संघ हा सामना सहज जिंकेल, अशी स्थिती होती. परंतु पाच मिनिटे बाकी असताना तेलुगू टायटन्सने २६-२६ अशी बरोबरी साधली. अखेरच्या मिनिटातील दोन निर्णायक चढायांनी विजयाचे पारडे तेलुगू टायटन्सकडे झुकले. राहुल चौधरीने चढाईत सुरेख गुण मिळवला आणि त्यानंतर शेवटच्या चढाईत सलील जयपालची पकड करून तेलुगू टायटन्सने बाजी मारली.
दीपकने चढायांचे ११ गुण (२ बोनस) आणि पकडींचे ३ गुण कमवले. प्रशांत राइकने ७ गुण (१ बोनस) मिळवत त्याला छान साथ दिली. मात्र या सामन्यात लक्ष वेधून घेतले ते बंगालकडून खेळणाऱ्या कोरियाच्या जांग कुन ली याने. त्याने आपल्या नेत्रदीपक चढायांसह १२ गुण (४ बोनस) मिळवत सर्वोत्तम चढाईपटूचा पुरस्कार पटकावला.
यु मुंबा विजयी घोडदौड कायम राखणार?
घरच्या मैदानावर चारपैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असणाऱ्या यु मुंबाची बाहेरच्या मैदानावर शुक्रवारी पहिली लढत बंगाल वॉरियर्ससोबत होणार आहे. यु मुंबा विजयी घोडदौड यापुढेही कायम राखणार का, ही कबड्डीरसिकांमध्ये उत्सुकता आहे. तर अद्याप एकही सामना जिंकू न शकलेले दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.
आजचे सामने
दबंग दिल्ली वि. पुणेरी पलटण
बंगाल वॉरियर्स वि. यु मुंबा
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्- २ आणि ३, स्टार स्पोर्टस् एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा