प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावर प्रत्येक संघ विजयासाठी खेळतो. कारण विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य या सर्वच संघांनी जोपासले आहे. परंतु हैदराबादशी नाते सांगणाऱ्या तेलुगू टायटन्सचा स्पध्रेतील प्रत्येक विजय हा सामाजिक ध्येयाने प्रेरित असेल. गरीब मुलींच्या शिक्षणाच्या उद्देशाने हा विजय महत्त्वाचा ठरणार आहे. तेलुगू टायटन्सचा संघ प्रत्येक विजयासह तीन मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, अशी घोषणा संघाने केली आहे.
‘‘नांदी फाऊंडेशन ही सामाजिक संस्था देशातील नऊ राज्यांत ‘नन्हीं कली’ हा उपक्रम राबवते. गरीब घरातील मुलींचे किमान दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचे कार्य ही संस्था करते. गेल्या दोन वर्षांत दोन लाखांहून अधिक मुलींचे शिक्षण या उपक्रमांतर्गत झाले आहे. या शालेय शिक्षणाच्या जोडीने त्यांच्या खासगी शिकवणीचा भारही उचलतो. याचप्रमाणे या मुलींना दरवर्षी आम्ही शैक्षणिक साहित्याचा समावेश असलेली ‘नन्हीं कली’ बॅग देतो,’’ अशी माहिती संस्थेच्या मुख्य धोरण अधिकारी रोहिणी मुखर्जी यांनी दिली.
तेलुगू टायटन्सचे मालक श्रीनिवासन श्रीरमणे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, ‘‘आमच्या संघाच्या पहिल्या विजयाप्रसंगीच आम्ही हे निश्चित केले. या अंतर्गत आम्ही संघाच्या प्रत्येक विजयासह तीन मुलींना दत्तक घेऊ आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करू. इतकेच नव्हे तर त्यांच्या नोकरीसाठीसुद्धा प्रयत्न करणार आहोत. अन्य संघसुद्धा आमचे अनुकरण करतील अशी मला आशा आहे.’’
‘‘प्रो कबड्डीत खेळणाऱ्या तेलुगू टायटन्सचा प्रस्ताव जेव्हा आमच्यापुढे आला, तेव्हा आम्हाला त्याचा अतिशय आनंद झाला. कारण आमच्या ‘नन्हीं कली’ उपक्रमातील पाचशेहून अधिक मुली या विविध खेळांमध्ये जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. त्यामुळे प्रो कबड्डीद्वारे खेळाशी जोडले गेलो आहोत,’’ असे नांदी फाऊंडेशनच्या शैक्षणिक अधिकारी डॉ. प्रीता भक्ता यांनी सांगितले. गचीबोली येथे चालू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या दिवशी सामन्याच्या मध्यंतराला ‘नन्हीं कली’ उपक्रमातील काही मुलींनी प्रदर्शनीय लढतीचा आनंद लुटला.
आजचे सामने
जयपूर पिंक पँथर्स वि. यु मुंबा
तेलुगू टायटन्स वि. पुणेरी पलटण
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्स-२ आणि ३, स्टार स्पोट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी