‘काशी, काशी..’हा जयघोष नवी दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलात निरंतर चालू होता. काशिलिंग आडकेने दिल्लीकरांना आपल्या मंत्रमुग्ध खेळाने प्रभावित करताना चढायांचे २४ गुण कमवून प्रो कबड्डी लीगमध्ये चढायांच्या सर्वाधिक गुणांचा विक्रम केला. परंतु अखेरच्या चढाईत तो बाद झाला आणि तेलुगू टायटन्सने दबंग दिल्लीला ४५-४५ असे बरोबरीत राखण्याची किमया साधली. त्यामुळे तेलुगू टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले आहे.
काशिलिंगने तेलुगू टायटन्सविरुद्ध २६ चढाया केल्या, यात तो पाच वेळा बाद झाला. तेलुगू टायटन्सकडून राहुल चौधरीने चढायांचे १३ गुण (२ बोनस) मिळवून दिल्लीला टक्कर दिली. दीपक हुडाने ११ गुण मिळवून त्याला चांगली साथ दिली.
दुसऱ्या लढतीत पुण्याचा संघनायक वझीर सिंगला जेरबंद करण्याची रणनीती यशस्वी ठरल्यामुळे जयपूर पिंक पँथर्सला पुणेरी पलटणला ३१-१८ अशा फरकाने धूळ चारता आली. जयपूरचा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. पुण्याने आक्रमक सुरुवात केली. परंतु जयपूरने नंतर सामन्यावर वर्चस्व मिळवून दोन लोण चढवले.
पुण्याच्या वझीरने १४ चढाया करून फक्त ३ गुण मिळवले, परंतु चार वेळा तो अपयशी ठरला, हेच जयपूरच्या पथ्यावर पडले. जयपूरचा डावा कोपरारक्षक रण सिंगने त्याची दोनदा सुरेख पकड करून चाहत्यांची मने जिंकली. रणने पकडींचे ४ आणि चढाईचा एक गुण मिळवला. राजेश नरवालने सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना चढायांचे ५ गुण मिळवले. कुलदीप सिंगने पकडींचे ४ गुण मिळवले.
आजचा सामना
यू मुंबा वि. बंगळुरू बुल्स
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्स-२ आणि ३, स्टार स्पोट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी