सुकेश हेगडे आणि प्रशांत राय यांच्या वर्चस्वपूर्ण चढायांच्या बळावर तेलुगू टायटन्सने पाटणा पायरेट्स संघाचा ३४-२२ असा पराभव केला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये आपल्या पाचव्या विजयाची नोंद करीत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. फक्त एकमेव विजय खात्यावर असलेला पाटण्याचा संघ मात्र तळाच्या स्थानावर आहे.
पाटण्याच्या पाटलीपुत्र क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात पहिल्या टप्प्यात तेलुगू टायटन्सला पाटणा पायरेट्सने चांगली लढत दिली. मध्यंतराला तेलुगू टायटन्सकडे १३-१२ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात सुकेश आणि प्रशांतच्या आक्रमणापुढे पाटण्याचे क्षेत्ररक्षण खुजे ठरले. तेलुगू टायटन्सचा डावा कोपरारक्षक संदीपने दिमाखदार पकडींचे कर्तृत्व दाखवत आठ गुण कमवले.
सुरुवातीला राकेश कुमारने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याला युवा संदीप नरवालने चांगली साथ दिली. तेलुगू टायटन्सचा भरवाशाचा खेळाडू राहुल चौधरी आणि दीपक निवास हुडा फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. परंतु सुकेश आणि प्रशांताने प्रत्येकी आठ गुण घेत तेलुगू टायटन्सला विजय मिळवून दिला.

आजचे सामने
*  तेलुगू टायटन्स वि. बंगळुरू बुल्स
*  पाटणा पायरेट्स वि. दबंग दिल्ली
*  वेळ : रात्री ७.५० वा. पासून
*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी

Story img Loader