तेलुगू टायटन्सने प्रो कबड्डी लीगमधील आपल्या पहिल्याच सामन्यात इराणी हिसका प्रतिस्पर्धी संघाला दाखवायला सुरुवात केली. कर्णधार राहुल चौधरी आणि दीपक हुडा दमदार चढाया करीत असताना इराणच्या मेराज शेखच्या अष्टपैलू कामगिरीमुळे दबंग दिल्लीला ३६-२७ अशा फरकाने शरणागती पत्करावी लागली. तसेच शब्बीर बापू आणि अनुप कुमारच्या चढायांच्या बळावर यजमान यु मुंबाने बंगळुरू बुल्सचा ३६-२३ असा पराभव करून आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
तेलुगू टायटन्सने प्रारंभीपासूनच दिल्लीचे आक्रमण आणि बचाव खिळखिळे करून मध्यंतराला १८-८ अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. तेलुगू टायटन्सने १४व्या मिनिटाला पहिला लोण चढवला होता, मग दुसऱ्या सत्रात २७व्या मिनिटाला आणखी एक लोण चढवून ही आघाडी २६-१५ अशी वाढवली. उत्तरार्धात काशिलिंग आडके आणि रोहित चौधरी यांनी ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
‘‘मागील हंगामात आमचा बचाव कमकुवत होता, परंतु या वेळी आम्ही त्यात सुधारणा केली. इराणी खेळाडूंशी संभाषण होत नसले तरी इशाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधतो,’’ असे कर्णधार राहुलने सामन्यानंतर सांगितले.
दुसऱ्या सामन्यात यु मुंबाने आक्रमणावर भर देत पहिल्या सत्रात १९-१४ अशी आघाडी घेतली. मग २८व्या मिनिटाला यु मुंबाने बंगळुरूवर लोण चढवला. शब्बीरने चढायांचे १० गुण (१ बोनस) तर अनुपने ८ गुण (२ बोनस) मिळवले. याचप्रमाणे सुरेंदर नाडा आणि मोहित चिल्लर यांनी भक्कम बचावाचा प्रत्यय घडवला. बंगळुरूकडून अजय ठाकूर आणि मनजीत चिल्लर यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.
गरिबांच्या शिक्षणासाठी तेलुगू टायटन्सचा विजय
तेलुगू टायटन्सचा प्रत्येक विजय हा देशातील अनाथ मुलांच्या शिक्षणाच्या उद्देशाने असणार आहे. तेलुगू टायटन्सचा संघ प्रत्येक विजयासह तीन मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, अशी माहिती पहिल्या विजयानंतर संघाच्या प्रवक्त्याने दिली. याबाबत आम्ही आमची भूमिका ठरवलेली आहे. अन्य संघसुद्धा आमचे अनुकरण करतील, अशी आशा त्यांनी प्रकट केली.
हादी ओश्तोरॅकला दुखापत
यंदाच्या लिलावात सर्वाधिक २१ लाख रुपयांची बोली जिंकणारा तेलुगू टायटन्सचा खेळाडू हादी ओश्तोरॅकला मात्र पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. दुखापत गंभीर स्वरूपाची नाही, तो सोमवारच्या सामन्यात खेळेल, असे कप्तान राहुल चौधरीने सांगितले.
आजचे सामने
पुणेरी पलटण वि. तेलुगू टायटन्स
यु मुंबा वि. पाटणा पायरेट्स
वेळ : रात्री ७.५० ते १०
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.