गेल्या काही महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा लागून राहिली होती, त्या नाटय़ाचा पडदा अखेर रविवारी उघडला. देशातील फुटबॉलमध्ये नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेच्या आठ संघांची आणि मालकांची घोषणा रविवारी करण्यात आली. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याबरोबरच स्पॅनिश लीग फुटबॉलमधील अ‍ॅटलेटिको माद्रिद, अभिनेते जॉन अब्राहम, रणबीर कपूर यांनी फुटबॉलच्या मैदानात उडी घेत फ्रँचायझी हक्क मिळवले आहेत.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आठ संघांमध्ये होणाऱ्या इंडियन सुपर लीगसाठी निविदा उघडण्यात आल्या. सचिन तेंडुलकर आणि पीव्हीपी व्हेंचर्सने कोची संघाचे हक्क मिळवले आहेत. गांगुलीने स्पॅनिश लीगमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रिद तसेच व्यावसायिक हर्षवर्धन नेओटिया, संजीव गोएंका आणि उत्सव पारेख यांनी मिळून कोलकाता फ्रँचायझी मिळवली आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि व्यवसायाने सनदी लेखापाल असलेल्या बिमल पारेख यांनी मुंबई संघाचे हक्क मिळवले आहेत. सलमान खान तसेच वाधवान समूहाचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी पुणे संघाचे हक्क प्राप्त केले आहेत.
‘दन दना दन गोल’ म्हणत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता जॉन अब्राहमने शिलाँग लजाँग या आय-लीगमधील संघासह गुवाहाटी संघाचे फ्रँचायझी हक्क मिळवले आहेत. डेन नेटवर्कचे समीर मनचंदा यांनी दिल्ली संघाचे तर आयपीएलमधील हैदराबाद सनरायझर्सचे मालकी हक्क असलेल्या सन समूहाने बंगळुरू संघाचे तसेच व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत, दत्ताराज साळगांवकर आणि श्रीनिवास डेम्पो यांनी गोवा संघाचे हक्क जिंकले आहेत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने आयएमजी-रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील दिग्गज फुटबॉलपटूंचा समावेश असणार आहे. फ्रान्सचा रॉबर्ट पायरेस, अर्सेनलचा फ्रेड्रिक जंगबेर्ग यांच्यासारख्या फुटबॉलपटूंना ‘आयकॉन’ खेळाडूंचा दर्जा दिला जाणार आहे. आठ संघांचे हक्क मिळवण्यासाठी जवळपास ३०पेक्षा जास्त निविदा आल्या होत्या. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एखाद्या स्पर्धेला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद होता.
‘‘उद्योजक, क्रीडा आणि बॉलीवूडमधून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता दिल्ली, कोची, गुवाहाटी आणि बंगळुरू ही शहरेही देशातील फुटबॉलच्या केंद्रस्थानी असतील. गेल्या वर्षी आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीची सांगता करणारा सचिन हा कोची संघाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम पाहणार आहे,’’ असे या लीगचे संयोजक आयएमजी-रिलायन्सने म्हटले आहे. गांगुलीने कोलकाता संघाचे हक्क मिळवण्याकरिता चार वेगवेगळ्या नावांनी निविदा भरल्या होत्या. मात्र संघ विकत घेण्यासाठी या आठ संघमालकांनी किती रकमेची बोली लावली, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले.

देशातील सर्वोत्तम क्रीडापटू सचिन तेंडुलकरसह काम करण्याची संधी मिळणे, हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. कोची संघाच्या विकासासाठी आणि केरळमधील गुणवत्ता शोधून काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या गुणवत्तेला दर्जात्मक आणि स्पर्धात्मक स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्ही देणार आहोत. कोची संघाला जागतिक दर्जाचा क्लब बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
– प्रसाद पोटलुरी, कोची संघाचे सहमालक

फुटबॉल हा खेळ प्रत्येक भारतीयाच्या नसानसांत भिनलेला आहे. फिफा विश्वचषक, इंग्लिश प्रीमिअर लीग आणि चॅम्पियन्स लीगचे निस्सीम चाहते असणाऱ्या भारतातील असंख्य चाहत्यांना आम्ही दर्जेदार फुटबॉलची मेजवानी देणार आहोत. भारतीय फुटबॉलला नवसंजीवनी देण्याच्या दिशेने इंडियन सुपर लीग ही सुरुवात म्हणावी लागेल. भारतीय फुटबॉलचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डेन नेटवर्क या प्रयत्नांचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
– समीर मनचंदा, दिल्ली संघाचे मालक
इंडियन सुपर लीगमधील कोलकाता संघाचे हक्क मिळविल्यामुळे मी खूश आहे. भारतातील क्लबचे हक्क मिळविणारा अ‍ॅटलेटिको माद्रिद हा पहिला आंतरराष्ट्रीय संघ ठरला आहे. आम्ही कोलकाता संघाचे सहमालक आणि स्पर्धेच्या संयोजकांसह भारतातील फुटबॉलला नवी झळाळी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– मिग्युएल एंजेल गिल मारिन, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि कोलकाता संघाचे मालक.

देशातील युवा फुटबॉलपटूंना आम्ही योग्य व्यासपीठ मिळवून दिले आहे. फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारतातही फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे फिफा विश्वचषकात भारतीय संघ असावा, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
कपिल वाधवान, पुणे संघाचे सहमालक.

मी नेहमीच खेळाडू या नात्याने देशाच्या क्रीडा क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील राहीन. देशातील खेळाडूंना आपले कौशल्य विकसित करण्यासाठी इंडियन सुपर लीग हे व्यासपीठ म्हणजे सुवर्णसंधीच ठरणार आहे. युवा आणि फुटबॉलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या खेळाडूंबरोबर संवाद साधणे हा वेगळाच अनुभव ठरणार आहे. सक्षम आणि आव्हानात्मक कोची संघ घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोची संघाचा सदस्य म्हणून देशातील फुटबॉलचा विकास करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
– सचिन तेंडुलकर, कोची संघाचा सहमालक

इंडियन सुपर लीग आणि मुंबई संघाचा भाग असल्याचा अभिमान होत आहे. लहानपणापासूनच फुटबॉल हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. आता या खेळाच्या विकासात योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. इंडियन सुपर लीगद्वारे फुटबॉल हा खेळ तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास आहे.
रणबीर कपूर, मुंबई संघाचा सहमालक

Story img Loader