बडोद्याविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश करण्यात आल्यामुळे मुंबईची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. मात्र मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे वेगवान गोलंदाज या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे ३९ वेळा रणजी करंडक पटकावणाऱ्या मुंबईला झहीरची उणीव प्रकर्षांने भासणार आहे.
सचिनने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यामुळे तो रणजी करंडक स्पर्धेतील अन्य सामन्यांत खेळण्यासाठी उपलब्ध आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुजरातविरुद्ध झालेल्या गेल्या सामन्यात झहीरला दुखापत झाली होती. ‘‘झहीरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले असून तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात आहे,’’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आणि निवड समितीचे सल्लागार नितीन दलाल यांनी सांगितले.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी कर्णधार अजित आगरकर तंदुरुस्त झाला आहे. दुखापतीमुळे तो गुजरातविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे दोघेही मुंबईकर खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे मुंबईला त्यांची उणीव जाणवणार आहे.
मुंबई संघ : अजित आगरकर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वासिम जाफर, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, अभिषेक नायर, हिकेन शाह, आदित्य तरे, अंकित चव्हाण, निखिल पाटील (ज्युनियर), जावेद खान, शोएब शेख, विशाल दाभोळकर, शार्दुल ठाकूर, प्रशिक्षक : सुलक्षण कुलकर्णी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा