घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळण्याचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजच्या मालिकेचे वेळापत्रक ठरवण्यासाठी बीसीसीआयच्या कार्यक्रम आणि वेळापत्रकनिश्चिती समितीची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे.
राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. ज्या वानखेडे स्टेडियमवर सचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली, त्याच घरच्या मैदानावर अखेरची कसोटी खेळवण्याची इच्छा असल्याचे सचिनने बीसीसीआयला कळवले होते. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब होणार आहे.
सचिनची निरोपाची कसोटी मुंबईतच होईल, असे आश्वासन बीसीसीआयने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांना दिले आहे. ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारी पहिली कसोटी कोलकातात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान दुसरी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ २१, २४ आणि २७ नोव्हेंबर रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या ठिकाणाची घोषणा मंगळवारी होईल.
सचिनला भव्य-दिव्यपणे निरोप देण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. मायदेशात सचिनला निवृत्त होता यावे, यासाठी बीसीसीआयने भारतात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेचे आयोजन करण्याचे ठरवले. गेल्या आठवडय़ात सचिनने २००व्या कसोटीनंतर आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
ध्यानचंदइतकाच सचिन महान – मिल्खा सिंग
पुणे : भारतात क्रिकेटचा सध्या बोलबाला सुरू आहे, अशी टीका करणारे ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी सचिन तेंडुलकर याचे मात्र कौतुक केले आहे. त्यांनी सचिन हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याइतकाच महान खेळाडू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘सहसा मी क्रिकेट सामना पाहत नाही. मोहाली येथे जेव्हा सामने होतात तेव्हाही मला निमंत्रित केले जाते. मी काही मिनिटेच तेथे थांबतो व निघून जातो. मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकीत जे गौरवशाली स्थान मिळवून दिले आहे, ते स्थान क्रिकेटमध्ये सचिनने भारताला मिळवून दिले. त्याने निवृत्त होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशात आणखी सचिन तेंडुलकर कसे निर्माण होतील, यासाठी प्रयत्न करावेत.’’
सचिनचे स्वप्न पूर्ण होणार!
घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळण्याचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे.
First published on: 15-10-2013 at 04:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar innings an ode to city of his dreams