* सलग सहाव्यांदा अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत
* डेव्हिड फेररचा संघर्षपूर्ण लढतीत टिप्सारेव्हिचवर विजय
गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने सुसाट वेगाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. उपांत्यपूर्व फेरीत २००९च्या विजेत्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याचा ६-२, ७-६ (७/३), ६-४ असा सरळ तीन सेटमध्ये पाडाव करून जोकोव्हिचने सलग सहाव्यांदा अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
दुसऱ्या मानांकित जोकोव्हिचने सहाव्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या दिशेने कूच केली असून जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर आता जोकोव्हिचलाच जेतेपदासाठी दावेदार समजले जात आहे. मात्र अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी जोकोव्हिचला उपांत्य फेरीत डेव्हिड फेररच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तिसरा मानांकित अँडी मरे आणि चेक प्रजासत्ताकचा टॉमस बर्डीच आमनेसामने असणार आहेत.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे ग्रँड स्लॅम पटकावणाऱ्या जोकोव्हिचने गेल्या महिन्यात ऑलिम्पिक स्पर्धेत धूळ चारणाऱ्या अर्जेटिनाच्या डेल पोट्रोविरुद्ध ६-२ अशी सरशी साधली आहे. या कामगिरीसह जोकोव्हिचने सलग दहाव्यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. ‘‘डेल पोट्रो हा महान खेळाडू आहे. दुसऱ्या फेरीत मी फारच नशीबवान ठरलो. डेल पोट्रोने फोरहँडचे ताकदवान फटके लगावले. त्यामुळे त्याला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत मला पळवावे लागले,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.
डेव्हिड फेररच्या लढतीविषयी तो म्हणाला, ‘‘ही लढतही चुरशीची होणार आहे. गेल्या सहा-सात वर्षांत फेररने कामगिरीत सातत्य राखले आहे. मात्र फारच कमी जण त्याची स्तुती करतात.’’ चौथ्या आणि आठव्या गेममध्ये डेल पोट्रोची सव्‍‌र्हिस भेदून जोकोव्हिचने पहिला सेट सहज खिशात घातला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये डेल पोट्रोने धडाकेबाज पुनरागमन केले. सलग दहा गुण मिळवून त्याने २-० अशी आघाडी घेतली. ५-४ अशा स्थितीनंतर दुसरा सेट जिंकण्याची संधी डेल पोट्रोला होती. पण जोकोव्हिचने २६ फटक्यांच्या रॅलीनंतर दोन ब्रेकपॉइंट मिळवून दुसऱ्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी साधली. ट्रायब्रेकरमध्ये डेल पोट्रोने तीन सेटपॉइंट वाचवले. पण अखेर त्याला दुसऱ्या सेटवर पाणी सोडावे लागले. दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतर डेल पोट्रोला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे जोकोव्हिचने तिसऱ्या सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली. हीच आघाडी कायम ठेवत त्याने तिसऱ्या सेटसह सामन्यावर वर्चस्व गाजवले.
स्पेनच्या चौथ्या मानांकित डेव्हिड फेररला उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. फेररने सर्बियाच्या आठव्या मानांकित जान्को टिप्सारेव्हिच याचे आव्हान ६-३, ६-७ (५/७), २-६, ६-३, ७-६ (७/४) असे पाच सेटमध्ये परतवून लावत आगेकूच केली. २००४च्या फ्रेन्च खुल्या टेनिस स्पर्धेनंतर पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे दिग्गज टेनिसपटू नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा