भारताचा अव्वल टेनिसपटू लिएण्डर पेस याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे तिसरे जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे. पेस आणि त्याचा चेक प्रजासत्ताकचा सहकारी राडेक स्टेपानेक यांनी अंतिम फेरीत धडक मारली.उपांत्य फेरीत ६-६ अशी बरोबरी असताना सहाव्या मानांकित मार्शल ग्रानोलेर्स आणि मार्क लोपेझ या स्पेनच्या जोडीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे पेस-स्टेपानेक जोडीला विजयी घोषित करण्यात आले. लोपेझच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात आला होता. आपण पुढे खेळू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर लोपेझने कोर्ट सोडले. लोपेझविरुद्ध सहानुभूती व्यक्त करत पेस म्हणाला, ‘‘मार्क लोपेझला माझ्या शुभेच्छा आहेत. कडवी लढत देणारे हे दोघेही सन्मानास पात्र आहेत.’’
पेस-स्टेपानेक जोडीने सुरुवातीलाच लोपेझची सव्‍‌र्हिस भेदून २-१ अशी आघाडी घेतली. मार्शल-लोपेझ यांनी ब्रेकपॉइंट मिळवून सामन्यात ४-४ अशी बरोबरी साधली. पहिला सेट ५-५ अशा स्थितीत असताना लोपेझची दुखापत उफाळून आली. अखेर त्याने ट्रेनरला बोलावले. पण जिद्दी लोपेझ पुन्हा मैदानावर उतरला. पेसने आपल्या सव्‍‌र्हिसवर गुण मिळवत पहिला सेट ट्रायब्रेकरवर नेला. पण धावता येत नसल्यामुळे आपण यापुढे खेळू शकणार नाही, असे लोपेझने आपल्या सहकाऱ्याला सांगितले. त्यानंतर दोघांनीही सामन्यातून माघार घेण्याचे ठरवले. पेस-स्टेपानेक जोडीला आता अंतिम फेरीत बॉब आणि माइक ब्रायन किंवा ऐसाम उल-हक कुरेशी आणि जीन-ज्युलियन रॉजर यांच्यातील विजेत्या जोडीशी सामना करावा लागेल.

Story img Loader