आंतरराष्ट्रीय टेनिसपटू तसेच २३ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारी सेरेना विल्यम्स आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. द न्यूयॉर्क टाईम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात सेरेना विल्यम्सऐवजी तिची बहीण व्हेनस विल्यम्सचा फोटो लावण्यात आलाय. न्यूयॉर्क टाईम्सच्या याच चुकीची दखल खुद्द सेरेना विल्यम्सने घेतलीय. या प्रकरणावर तिने प्रतिक्रिया दिली असून आपली नाराजी व्यक्त केलीय. आपण आणखी चांगले काम करु शकता असे सेरेनाने द न्यूयॉर्क टाईम्सला उद्देशून म्हटले आहे. तर दुसरीकडे तिच्या चाहत्यांनी न्यूयॉर्क टाईम्सने माफी मागीवी अशी मागणी केलीय.

नेमकं काय घडलं ?

सेरेना विल्यम्सने नुकतेच सेरेना व्हेन्चर नावाचे एक फर्म सुरु केले आहे. या फर्मच्या माध्यमातून सेरेनाने तब्बल १११ मिलियन डॉलर्सचा निधी जमवलाय. याबाबतचे वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. मात्र यावेळी न्यूयॉर्क टाईम्सने सेरेना विल्यम्सऐवजी तिची बहीण व्हेनस विल्यम्सचा फोटो लावला. सेरेना विल्यम्सने न्यूयॉर्क टाईम्सच्या या चुकीची दखल घेत ट्विट केले आहे. यामध्ये “आपण कितीही पुढे आलो तरी ते पुरेसं नसल्याची जाणीव आपल्याला करुन दिली जाते. याच कारणामुळे सेरेने व्हेन्चरसाठी मी १११ मिलियन डॉलर्स उभे केले आहेत. जे संस्थापक दुर्लक्षित आहेत त्यांना मदत करण्यासाठी मी हा पैसा उभा केला आहे. कारण मि पण दुर्लक्षित आहे. द न्यूयॉर्क टाईम्स आपण आणखी चांगलं करु शकता,” असं सेरेनाने म्हटलंय.

दरम्यान, सेरेनाने केलेल्या ट्विटनंतर न्यूयॉर्क टाईम्सने स्पष्टीकरण दिलं आहे. ही आमची चूक होती. छापील प्रतिसाठी फोटो निवडताना ही चूक झाली. ऑनलाईन प्रतिमध्ये ही चूक झालेली नाही. उद्याच्या अंकात आम्ही ही चूक दुरुस्त करू,” असं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलंय. मात्र सेरेनाच्या चाहत्यांनी या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त केलीय. या चुकीमुळे न्यूयॉर्क टाईम्सने रितसर माफी मागायला हवी. तसेच हे वृत्त उद्याच्या अंकात सन्मनपूर्वक पुन्हा एकदा प्रसिद्ध करायला हवे, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर ही चूक नव्हे तर याला वंशवाद आणि लिंगभेद म्हणतात, अशी टोकाची प्रतिक्रिया सेरेनाच्या महिला चाहतीने दिलीय.

Story img Loader