पॅरिस : यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील लांबलेल्या लढती चर्चेच्या विषय ठरू पहात आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतील अनेक लढती पहाटे संपल्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या वर पर्याय शोधण्यासाठी कुणीच एकत्र आलेले नाही.
महिला एकेरीतील अव्वल मानांकित इगा श्वीऑटेकने तर, मला रात्रीची झोप आवश्यक आहे. त्यामुळे पहाटे खेळणे मला नक्कीच आवडणार नाही, असे सांगितले. खेळाडूच काय पण सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांनाही पहाटेपर्यंत थांबणे कठीण आहे. सर्वांसाठी असे पहाटे खेळणे योग्य नाही, यावर सध्या खेळणारे खेळाडू आणि माजी खेळाडूंमध्ये एकमत झाले. पण, त्यावर पर्याय शोधण्यासाठी कुणीच एकत्र येताना दिसून आले नाहीत.
पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील लढत हे याचे उत्तम उदाहरण मानता येईल. ही लढत मुळांत रात्री १०.३०वाजता सुरू झाली आणि पाच सेटपर्यंत रंगली. जेव्हा लढत संपली तेव्हा पहाटे ३.३० वाजून गेले होते. इतक्या उशिरा सामने संपत असल्यामुळे अनेक चाहते कोर्टवर येण्यापेक्षा घरातूनच सामने पाहणे पसंत करत आहेत. पण, खेळाडूंच्या बरोबरीने कोर्टवरील कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे देखील हाल होत असल्याकडे अनेक जण लक्ष वेधत आहेत.
महिला टेनिसपटू कोको गॉफने याबाबत स्पष्ट मत मांडताना असे वेळापत्रक खेळाडूंच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. सामना कधी संपेल हे निश्चित नसल्यामुळे ते ठराविक वेळेत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. या वेळी तिने विम्बल्डनचे सामने कितीही लांबले तरी दिवसाचे सत्र रात्री ११ वाजता बंद केले जाते याची आठवण करुन दिली.
हेही वाचा >>> T20 World Cup 2024 साठी चकित करणारी बक्षीसाची रक्कम जाहीर, क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच मिळणार इतकी मोठी रक्कम
माजी विजेता जिम कुरियरने यावर स्पष्ट मत व्यक्त केले. कुरियर म्हणाला,‘‘सामने लांबणे किंवा उशिरा सुरू होणे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आधीचे सामने उशिरा संपल्यामुळे पुढील सामन्यांच्या वेळा पुढे सरकतात, तर कधी हवामानाचा परिणाम होतो. या वेळी शनिवारसह सलग पाच दिवस पावसाच्या उपस्थितीने वेळापत्रक कोलमडून गेले होते.’’
जोकोविच आणि मुसेट्टी सामन्याला अशाच कारणामुळे उशिरा झाला. या लढतीआधी होणारी लढत पावसामुळे रोखण्यात आली होती. पाऊस थांबल्यावर ती पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर अगदी ऐनवेळी जोकोविचची लढत आच्छादित सेंटर कोर्टवर खेळविण्यात आली. या वेळी जोकोविचने अशा वेळी गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जाऊ शकतात असे मत मांडले.
‘‘ग्रँडस्लॅम स्पर्धेत सामना जिंकणे हा आनंद काही वेगळाच असतो. पण, जेव्हा तो पहाटे ३.३० वाजता संपतो तेव्हा तो आनंद घेता येत नाही. जर तो सामना स्पर्धेतील शेवटचा असता, तर गोष्ट निराळी. पण, जेव्हा फेरीचे सामने असतात, तेव्हा विजेत्या खेळाडूला पुढच्या फेरीचे वेध लागलेले असतात,’’ असे जोकोविच म्हणाला.
सामन्यांना उशीर होत असल्याची बाब खरी आहे. हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. यात सुधारणा करण्यासाठी आम्ही काही करू शकलो, तर नक्कीच विचार करू. पण, या वर्षी प्रश्न सुटेल असे सांगू शकत नाही. -ल्यू शीर, अमेरिकन टेनिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी