डेव्हिस चषकाच्या मुद्यावरून बंडखोरी करणाऱ्या टेनिसपटूंनी आता खेळाडूंच्या संघटनेची स्थापना केली आहे. काही दिवसांपूर्वीच या अकरा खेळाडूंनी अखिल भारतीय टेनिस संघटनेशी (एआयटीए) असलेले वाद मिटवत समझोता केला होता. मात्र एआयटीएने विचारात घेतल्या नसलेल्या काही तत्कालीन मागण्यांसाठी या संघटनेची निर्मित्ती करण्यात आल्याचे या अकरा खेळाडूंनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच या सर्व अकरा खेळाडूंनी इंडोनेशियाविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीसाठी आपण उपलब्ध असल्याचे कळवले होते. आता या सर्वानी खेळाडूंच्या मागण्यांसाठी ‘भारतीय टेनिस खेळाडू संघटना’ (इंडियन टेनिस प्लेअर्स असोसिएशन) या व्यासपीठाची निर्मित्ती केली आहे.    
‘ना नफा तत्त्वावर चालणारी ही संघटना संविधानाच्या कलम २५नुसार तयार करण्यात आली आहे. देशातील सध्याची टेनिस प्रशासन यंत्रणा खेळाडूंचे प्रश्न मांडत नाही किंवा खेळाडूंचे प्रश्न विचारात घेत नाही. आणि म्हणूनच ही संघटना उभारण्यात आली आहे, असे खेळाडूंनी पत्रकाद्वारे सांगितले.
या संघटनेच्या संस्थापक सदस्यांमध्ये जयदीप मुखर्जी, महेश भूपती, कार्ती पी. चिदंबरम, इन्रिको पिपेर्नो, मनिषा मल्होत्रा, प्रल्हाद श्रीनाथ, सोमदेव देववर्मन, रोहन बोपण्णा, आदित्य सचदेव आणि मुस्तफा घौस यांचा समावेश आहे. ही संघटना खेळाडूंना आपले म्हणणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असेल. याचप्रमाणे देशातील क्रीडा क्षेत्राची स्थिती सुधारावी यासाठी संघटनेद्वारे प्रयत्न केले जातील, असे सोमदेव देववर्मनने सांगितले. संघटनेची कार्यकारिणी समिती निर्माण होईपर्यंत जयदीप मुखर्जी अंतरिम अध्यक्ष असतील, असे सोमदेवने स्पष्ट केले.
‘‘मुखर्जी यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला संतुलित भूमिका मिळेल. याशिवाय डेव्हिस चषकातील त्यांची खेळाडू आणि कर्णधार म्हणून कामगिरी वादातीत आहे. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे,’’ असे तो पुढे म्हणाला.  
‘‘खेळाडू तसेच त्यांच्या मार्गदर्शकांचे राहणीमान उंचावण्यासाठी तसेच प्रतिभाशाली खेळाडूंच्या भविष्यासाठी काही योजना तयार करण्यावरही संघटनेचा भर असेल. विशेष म्हणजे खेळाडूंना टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष कार्ती पी. चिदंबरम यांचा पाठिंबा आहे.
प्राथमिक टप्प्यात सदस्य शुल्क हाच संघटनेसाठी मुख्य निधी असेल, मात्र थोडय़ा वेळानंतर कॉर्पोरेट क्षेत्राची मदत घेण्यात येणार आहे,’’ असे सोमदेवने सांगितले. भारतीय संघाची इंडोनेशियाविरुद्धची डेव्हिस चषक लढत ५ ते ७ एप्रिल या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे.