युवा खेळाडूंना खेळ आणि तंदुरुस्तीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी पेस प्रोफेशनल स्पोर्ट्स अकादमीची स्थापना करण्याचा अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचा विजेता लिएण्डर पेसचा मानस आहे. प्रदीर्घ कारकीर्दीत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या निमित्ताने मैत्री झालेल्या प्रशिक्षक, सरावतज्ज्ञ यांच्या अनुभवाचा भारतीय खेळाडूंना फायदा व्हावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे पेसने यावेळी सांगितले. या ऐतिहासिक जेतेपदच्या निमित्ताने गुरुवारी खार जिमखान्यातर्फे पेसचा खास सत्कार करण्यात आला.
‘‘भारताचे प्रतिनिधित्त्व करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. असंख्य चाहत्यांचा चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहणे हेच खूप प्रेरणादायी आहे. अनेक युवा खेळाडूंना खेळासाठी प्रेरित करणे सुखावह आहे. खेळाचा आनंद घेतोय, खेळाप्रती कराव्या लागणाऱ्या मेहनतीचा आनंद घेतोय तोपर्यंत खेळणार आहे,’’ असे पेसने सांगितले.
‘‘सातत्याने चुकांतून शिकणे महत्त्वाचे आहे. बेसलाइनवरून खेळताना संतुलनात मला थोडी अडचण होती. यासाठी ऑलिम्पिक पदकविजेता अँडी मरेचे प्रशिक्षक इव्हान लेंडल यांचे मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. एकहाती बॅकहँडच्या फटक्यावर कसे नियंत्रण मिळवावे, यासंदर्भात त्यांनी केलेल्या सूचना उपयुक्त ठरल्या. खेळताना होत असलेल्या चुका टाळण्यासाठी खार जिमखान्याच्या कोर्टवर सातत्याने सराव करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेतेपदांचे, यशाचे मूळ जिमखान्यातील कोर्ट्सवरच्या मेहनतीला आहे,’’ असे पेसने सांगितले. नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे यांचा खेळ पाहून खेळाचे अनेक बारकावे शिकतो.
अमेरिकन खुल्या स्पर्धेतील ग्रँड स्लॅम जेतेपदामध्ये साथीदार राडेक स्टेपानीकबद्दल पेसला विचारले असता पेस म्हणाला, ‘‘राडेक हा अतिशय मेहनती खेळाडू आहे. एकेरीतून दुहेरीत संक्रमण सोपे नसते, मात्र राडेकने दुहेरी प्रकाराचा योग्य अभ्यास केला आहे. तो अतिशय चतूर खेळाडू आहे. त्याच्यासोबत खेळताना आनंद मिळतोच तसेच अनेक गोष्टी शिकायला मिळतात.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘४०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी व्यायामात, आहारात, सरावात आवश्यक बदल करावे लागतात. पण ही प्रक्रिया आनंददायी असते. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असतो. कारकीर्दीत अनेक खडतर टप्पे आले. मात्र त्यासमोर हार न मानता संघर्ष करत राहिलो. आयुष्याचा आणि खेळाचा मी एक विद्यार्थी आहे. या तत्वानुसार वाटचाल करतो.’’