टेनिस जगतामध्ये सध्या विम्बल्डनचा थरार रंगात आलेला आहे. या दरम्यान भारतीय टेनिससाठी काहीशी वाईट बातमी आली आहे. भारताची तारांकित टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधू निवृत्ती स्वीकारली आहे. विम्बल्डन २०२२ ही आपल्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, याची कल्पना तिने पूर्वीच दिलेली होती. त्यामुळे या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतील उपांत्य फेरीचा सामना तिचा शेवटचा सामना ठरला. आपल्या शेवटच्या सामन्यानंतर तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
मिश्र दुहेरी प्रकारात सानिया आणि तिचा क्रोएशियन जोडीदार मेट पॅव्हिक यांना गतविजेत्या नील कुप्स्की आणि डिझायर क्रोजिक यांच्याकडून ४-६, ७-५, ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला. महिला दुहेरी स्पर्धेतून तर ती यापूर्वीच बाहेर पडली होती. याच स्पर्धेत सानियाने २०१५ मध्ये महिला दुहेरी गटात विजेतेपद पटकावले होते. याच मैदानावर तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
हेही वाचा – ग्रँडस्लॅमसह निवृत्तीचं सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव!
शेवटच्या सामन्यानंतर सानियाने सोशल मीडियावर लिहिले, “खेळामध्ये तुमच्या मानसिक, शारीरीक आणि भावनिक क्षमतेचा कस लागतो. येथे तुम्हाला विजय आणि पराभव पचवावे लागतात. पराभूत झाल्यानंतर कित्येक रात्री झोपही येत नाही. असे असले तरी खेळातून तुम्हाला बरेच काही मिळतेदेखील. मला खेळातून जे मिळाले त्याबद्दल मी समाधानी आणि कृतज्ञ आहे. विम्बल्डनमध्ये खेळणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. मला नक्कीच या सर्वाची आठवण येईल.”
भारतीय महिला टेनिसला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात सानियाचे मोठे योगदान आहे. तिने आपल्या २०वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा, विम्बल्डन आणि यूएस खुल्या टेनिस स्पर्धांतील महिला दुहेरी प्रकारात प्रत्येकी एक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे. याशिवाय, फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आणि यूएस खुली टेनिस स्पर्धांतील मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपदं मिळवली आहेत. २०१६मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत तिने महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.