यंदाची अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा सच्चा टेनिसरसिकाला रुखरुख लावणारी आहे. सुपरमॉम किम क्लायस्टर्स आणि सुपर सव्र्हिससाठी प्रसिद्ध अँडी रॉडिक या दोघांनी टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. किमने या निर्णयाची आधी कल्पना दिली होती, मात्र रॉडिकने अचानक घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. दोघांनीही लहान वयात टेनिसची रॅकेट हातात घेतली आणि तेव्हापासून टेनिस हेच त्यांचे विश्व झाले. स्थानिक क्लब, शालेय स्पर्धा, ज्युनियर गट आणि त्यानंतर व्यावसायिक टेनिसपटू म्हणून पदार्पण.. असंख्य स्पर्धा.. ग्रँडस्लॅम चषक उंचावताना झालेला मनस्वी आनंद आणि डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू.. अगदी मोक्याच्या क्षणी शरीराच्या महत्त्वाच्या अवयवाने सोडलेली साथ..त्यानंतर त्या दुखण्यापायी कोर्टपासून लांब राहावे लागण्याचे दु:ख.. क्रमवारीतले अव्वल स्थान.. अटीतटीच्या सामन्यात विजयासाठी आपल्या नावाचा जयघोष करणारे कट्टर समर्थक.. जेतेपदाने दिलेली हुलकावणी हे सगळे या दोघांनी जवळून अनुभवले. पण आता आपण थांबलो पाहिजे, याची जाणीव या दोघांना एकाच वेळी व्हावी हा विलक्षण योगायोग. कधी थांबायचे हे ज्याला कळते तोच खरा सच्चा पाईक असतो. उगाचच महानतेची झूल पांघरून.. युवा खेळाडूंच्या मार्गात अडसर बनून.. शरीर नको म्हणत असताना खेळण्यात आनंद नाही, हे या दोघांनी जाणले आणि रॅकेट खाली ठेवण्याचा निर्णय पक्का केला.
किमचे वडील फुटबॉलपटू तर आई जिम्नॅस्ट, त्यामुळे खेळण्याचे बाळकडू घरातूनच मिळालेले. अँडीचे वडील व्यापारी, तर आई शिक्षिका. पण दोन्ही भाऊ टेनिस खेळणारे असल्याने त्यांच्याकडूनच या खेळाचा वसा अँडीकडे आलेला. ज्युनियर गटातून खेळताना या दोघांची कामगिरी वाखाणण्याजोगी. ९८ सालच्या विम्बलडनच्या ज्युनियर स्पर्धेत किमने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्याच वर्षी दुहेरीत तिने फ्रेंच आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. सततच्या पराभवामुळे अँडीने १७व्या वर्षीच टेनिसला सोडण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रशिक्षक तारिक बेनहाबिल्स यांनी त्याला तसे करू दिले नाही. सलग चार महिने त्यांनी अँडीच्या खेळावर लक्ष केंद्रित केले. या परिश्रमांचा परिणाम तात्काळ दिसून आला. अँडीने २००० साली ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेची जेतीपदे नावावर केली. ज्युनियर गटात आपले कौशल्य सिद्ध केल्यावर या दोघांची व्यावसायिक टेनिसमधली घोडदौड सुरू झाली. २००३ वर्ष अँडीसाठी महत्त्वाचे ठरले. याच वर्षी त्याने विम्बल्डन स्पर्धेत त्यावेळी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या आंद्रे आगासीला चीतपट केले. त्यानंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेत ज्युआन कार्लोस फरेरोवर मात करीत पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. या दिमाखदार कामगिरीसह वयाच्या २१व्या वर्षी अँडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे किम अनेक ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत पोहचत होती मात्र जेतेपदावर तिला कब्जा करता येत नव्हता. मात्र सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे किमने क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला. ग्रँडस्लॅम जेतेपदाशिवाय हे स्थान पटकावणारी ती पहिलीच खेळाडू ठरली होती. अखेर २००५ मध्ये तो क्षण आलाच.. मेरी पिअर्ससाख्या तगडय़ा प्रतिस्पर्धीवर मात करत किमने पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केले. किमची ताकद होती सर्वागसुंदर खेळ. संपूर्ण कोर्टचा उपयोग करून घेत भात्यातले सर्व फटके परजत प्रतिस्पध्र्याला नामोहरम करणे ही तिची खासियत. मात्र तिच्या सहज हालचालींना दुखापतींनी वेढा दिला. दुखापतींमुळे तिच्या कामगिरीवर परिणाम होऊ लागला आणि त्यामुळेच कंटाळून २००७ मध्ये तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. अँडीसाठी ताकदवान सव्र्हिस हे त्याचे प्रमुख अस्त्र होते. याच्या बळावरच तो समोरच्याला जेरीस आणत असे. अँडीलाही दुखापतींनी घेरले. कामगिरी मनासारखी होत नसल्याने त्याने दिग्गज खेळाडू जिमी कॉनर्स यांचे प्रशिक्षकपद स्वीकारले. मात्र काही वर्षांतच त्यांच्याशी मतभेद झाल्याने अँडी आपल्या भावाकडून मार्गदर्शन घेऊ लागला. टेनिससारखा वैयक्तिक खेळात सक्षम मार्गदर्शकाची आवश्यकता असते. अँडी नेमका तिथेच कमी पडला आणि याच कालावधीत टेनिसच्या क्षितिजावर रॉजर फेडरर नावाचा तारा उदयास आला. अनेक स्पर्धाच्या अंतिम फेरीपर्यंत रॉडिक आगेकूच करीत असे मात्र अंतिम मुकाबल्यात फेडररच बाजी मारीत असे. कालांतराने फेडररच्या विजयरथापुढे रॉडिकचे निष्प्रभ होणे सवयीचे झाले. पण तरीही सर्वोत्तम कामगिरी करण्याची जिद्द त्याने कधीच सोडली नाही आणि म्हणूनच अव्वल दहामध्ये तसेच सगळ्या महत्त्वाच्या स्पर्धाच्या अंतिम आठमध्ये अॅण्डीचे नाव निश्चित असे. दुसरीकडे किमने अकाली निवृत्तीनंतर बास्केटबॉलपटू ब्रायन लाँचशी विवाह केला. वर्षभरातच किमने तिच्यासारख्याच दिसणाऱ्या जेडला जन्म दिला. या सगळ्या आनंदाच्या क्षणांतही किमला दु:खाची टोचणी होती- टेनिसपासून दूर झाल्याची. याच ओढीने तिने पुन्हा कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतला. २००९ च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत वाइल्डकार्ड प्रवेशासह किमने थेट जेतेपदावरच नेम साधला. मातृत्वाची जबाबदारी पेलल्यानंतर ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी किम केवळ तिसरी खेळाडू ठरली. पुढच्याच वर्षी पुन्हा एकदा याच स्पर्धेचे जेतेपद आणि २०११ सालच्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत किमने आपण सुपरमॉम असल्याचे सिद्ध केले. निवृत्तीनंतर किमकडे जेडच्या संगोपनाची जबाबदारी आहे, तर अॅण्डीला त्यानेच स्थापन केलेल्या फाऊंडेशनच्या कामाचा व्याप सांभाळायचा आहे. आपल्या वैशिष्टय़पूर्ण खेळाच्या जोरावर टेनिसला भरीव योगदान देणाऱ्या या रॅकेटपटूंची कारकीर्द युवा खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल हे निश्चित!
अलविदा!
यंदाची अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा सच्चा टेनिसरसिकाला रुखरुख लावणारी आहे. सुपरमॉम किम क्लायस्टर्स आणि सुपर सव्र्हिससाठी प्रसिद्ध अँडी रॉडिक या दोघांनी टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. किमने या निर्णयाची आधी कल्पना दिली होती, मात्र रॉडिकने अचानक घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. दोघांनीही लहान वयात टेनिसची रॅकेट हातात घेतली आणि तेव्हापासून टेनिस हेच त्यांचे विश्व झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-09-2012 at 12:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis tennis player kim clijsters tennis player andy roddick american tennis open 2012 tennis player kim clijsters and andy roddick retaired