स्त्री-पुरुष समानता हा खेळाशी निगडित विषय होण्याचे कारण नाही. मात्र टेनिसविश्वात प्रत्येक आघाडीवर पुरुष आणि महिला खेळाडूंना एकच मापदंड असावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुषांइतकीच बक्षीस रक्कम महिलांना मिळावी यासाठी मोहीम चालवण्यात आली. आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना आणि महिला टेनिसपटूंच्या आग्रही भूमिकेमुळे ही मोहीम फत्ते झाली. मात्र पुरुषांच्या तुलनेत कमी खेळूनही बक्षीस रक्कम मात्र समान मिळत असल्याने महिलांनीही पाच सेट्स खेळावेत, अशी मागणी जोर धरू लागली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला टेनिस संघटनेच्या सर्वेसर्वा स्टॅके अलॅस्टर यांनी हा पर्याय उचलून धरला.
प्रसिद्धीसाठी आणि ग्लॅमरबाजीसाठी वक्तव्य करणाऱ्या या बाई नाहीत. स्वत: टेनिस खेळल्यानंतर संयोजक म्हणून काम पाहिलेल्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला टेनिस संघटनेच्या महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असणारी ही व्यक्ती. महिला टेनिसपटूंचे आरोग्य, वेळापत्रकाचे सुयोग्य नियोजन, खेळाडूंना आíथकदृष्टय़ा बळकट करण्यासाठी प्रायोजकांची मदत अशा अनेक आघाडय़ांवर स्टॅके यांनी मोलाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी काढलेले उद्गार सहज म्हणून नाकारता येणार नाहीत. महिलांसाठी तळमळीने काम करणाऱ्या स्टॅके यांच्या प्रयत्नांमुळेच ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये पुरुषांएवढीच बक्षीस रक्कम महिलांनाही देण्याचा निर्णय झाला. त्याच स्टॅके यांनी आता महिलांसाठी पाच सेट्सच्या सामन्यांचा पर्याय मांडला आहे. महिला खेळाडू शारीरिक तसेच मानसिकदृष्टय़ा अशा सामन्यांसाठी तयार असल्याचे स्टॅके यांनी सांगितले आहे.
हे सर्व असले तरी बक्षीस रक्कम समान मिळते आहे म्हणून महिलांनी पाच सेट्सचे सामने खेळणे व्यवहार्य ठरत नाही. गेल्या काही वर्षांतील महिला टेनिसपटूंचा खेळ पाहिला तर सातत्य हा कळीचा मुद्दा ठरतो. सेरेना विल्यम्सचा अपवाद वगळता, अन्य कोणालाच त्याच कौशल्याने, तडफेने, ऊर्जेने खेळ करता येत नाही. व्हिक्टोरिया अझारेन्काने आंतरराष्ट्रीय स्तरासाठी आपण तयार असल्याचे सिद्ध नक्कीच केले आहे, परंतु एखादे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकूनही महानतेची बिरुदावली मिळू शकत नाही. ग्रँड स्लॅम जेतेपद हे अनोखे असते. अपार मेहनत, जिद्द, तंदुरुस्ती हे सगळे पणाला लावल्यानंतरच जेतेपदाचा झळाळता चषक उंचावण्याचे भाग्य मिळते. अ‍ॅना इव्हानोव्हिक, लि ना, समंथा स्टोसूर, पेट्रा क्विटोव्हा, मारिओन बाटरेली यांनी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावता येते, हा विश्वास दिला. मात्र या यशाला सातत्याची किनार लाभली नाही. ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारे खेळाडू पुढच्या स्पर्धेत प्राथमिक फेरीतच बाद होण्याच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. यामुळे पाच सेट्सचे सामने खेळवल्याने या परिस्थितीत फरक पडेल असे नाही. ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणेही दुर्मीळ असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अव्वल ३२ खेळाडूंनाच स्थान मिळते. महिला टेनिसमधल्या या सर्वोत्तम खेळाडू अशी त्यांची ओळख असते, परंतु गेल्या काही वर्षांत ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये एकतर्फी निकालांची परंपरा वाढली आहे. सेरेनासारखी खेळाडू ६-०, ६-० असा प्रतिस्पर्धी खेळाडूचा धुव्वा उडवते. या विजयात सेरेनाच्या अफलातून खेळाला श्रेय द्यायला हवे, पण प्रतिस्पर्धी खेळाडूला एखादा गुणही मिळवता येऊ नये, यासारखी केविलवाणी गोष्ट नाही आणि हे सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या व्यासापीठावर घडते. केवळ सेरेनाचे नव्हे तर महिला टेनिसपटूंच्या बऱ्याच लढतीत गुणसंख्या अशी एकसुरी असते. हे जर असेच राहणार असेल तर तीन सेट्सवरून पाच सेट्स केले तर एकतर्फी निकालांची परंपरा वाढीसच लागेल. केवळ संख्यात्मक आकडेवारीपेक्षा खेळाचा दर्जा, गुणवत्ता याला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे.
टेनिस हा वैयक्तिक स्वरूपाचा खेळ आहे. विविध फटक्यांसाठी खांदे, पाय, मनगटे आणि कोर्टवरच्या वावरामुळे पर्यायाने संपूर्ण शरीराचीच या खेळाच्या निमित्ताने कसोटी असते. सातत्याने प्रतिस्पर्धी कसा खेळेल याची एकटय़ानेच चाचपणी करायची असल्याने मानसिकदृष्टय़ाही टेनिसपटू अधिक थकतो. पुरुष आणि स्त्री यांच्या शरीररचनेत काही मूलभूत फरक आहेत. त्याचा अभ्यास करूनच नियम ठरवण्यात आले आहेत.
तीन सेट्सचे सामने खेळतात म्हणून महिला टेनिसपटू शारीरिकदृष्टय़ा कमकुवत आहेत असा होत नाही, परंतु केवळ समानतेच्या अट्टहासासाठी पाच सेट्सचे सामने खेळवणे महिला टेनिसपटूंच्या तंदुरुस्तीला बाधा आणू शकते. दुखापतींमुळे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. विम्बल्डन विजेती बाटरेलीने दुखापतींना कंटाळूनच अचानक निवृत्ती जाहीर केली. सेट्सची संख्या वाढल्यास सामन्याचा वेळ वाढेल, त्याचप्रमाणे तंदुरुस्तीची पातळीही उंचवावी लागेल. तीन सेट्सचे सामने हे वर्षांनुवर्षे चालत आलेले समीकरण आहे. अचानक हे समीकरण बदलल्यास त्याच्याशी महिला टेनिसपटूंना जुळवून घेणे कठीण होईल. टेनिससारख्या दमवणाऱ्या खेळात वातावरणाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. आद्र्रता जास्त असणाऱ्या, प्रचंड उष्मा असलेल्या ठिकाणी प्रदीर्घ काळ सामना खेळणे आव्हानात्मक आहे.
‘‘वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी होईल. पाच सेट्सच्या सामन्यांबाबत महिला टेनिसपटूंची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. केवळ बक्षीस रक्कम समान आहे म्हणून सेट्सची संख्या वाढवणे योग्य नाही. यामुळे दुखापती वाढू शकतात,’’ या अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या सूचनेचा विचार करण्याची आवश्यकता आहे.