नवी दिल्ली : पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळू न शकलेला कर्णधार रोहित शर्मा हा संघात दाखल झाला असून, दुसऱ्या कसोटीपासून तो संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहितच्या येण्याने आता संघ व्यवस्थापनासमोर सलामीला कोण आणि मधल्या फळीत कोण, हा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे. त्यातच ३० नोव्हेंबरला कॅनबेरा येथे होणाऱ्या सराव सामन्यात रोहित स्वत: सलामीला येतो की राहुलला पाठवतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या कसोटी सामन्यात स्थान मिळालेल्या देवदत्त पडिक्कलच्या जागी रोहित शर्मा पुनरागमन करणार हे निश्चित आहे. जायबंदी शुभमन गिल सामन्यासाठी वेळेत तंदुरुस्त होतो की नाही यावर त्याचा सहभाग अवलंबून असेल. गिल तंदुरुस्त न झाल्यास रोहित किंवा राहुलपैकी एकाला तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करावी लागेल. रोहित नसल्याने राहुलला पहिल्या कसोटीत सलामीला पाठवण्यात आले होतेे. त्याने कसोटीच्या दोन्ही डावांत २६ आणि ७७ धावा केल्या. या सामन्यापूर्वी त्याने भारत ‘अ’ संघाकडून सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. कसोटी सामन्यापूर्वी राहुलवर क्रिकेट खेळायला विसरला इतक्या पराकोटीची टीका होत होती. मात्र, पहिल्या कसोटीत राहुलने या सर्वांना उत्तर दिले आहे. त्यामुळे राहुलने सलामीलाच खेळावे असा विचार पुढे येत आहे.

हेही वाचा >>>IPL 2025 Unsold Players List : डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन आणि शार्दुल ठाकुरसारखे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड, पाहा यादी

गेली पाच वर्षे कसोटीत डावाची सुरुवात करणारा रोहित सर्वश्रेष्ठ लयीत नाही. भारतात झालेल्या पाच कसोटी सामन्यांतही त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. रोहितने पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर खेळावे असे मत मांडले जात आहे. त्याच वेळी रोहित सलामीलाच खेळल्यास राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल यात शंका नाही. अर्थात, गिलने अजून नेटमधील सरावाला सुरुवात केलेली नाही. जोपर्यंत गिल नेटमध्ये पुरेसा सराव करत नाही, तोवर त्याला खेळविण्याचा संघ व्यवस्थापन विचार करणार नाही. गिल तंदुरुस्त ठरल्यास ध्रुव जुरेलला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tension in the team batting lineup as captain rohit sharma is in test cricket match sport news amy