Champions Trophy 2025: अनेक वर्षांनंतर आयसीसीची क्रिकेट स्पर्धा यंदा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये क्रिकटचे सामने खेळले जात नव्हते. त्यानंतर २०१९ पासून काही प्रमाणात इतर देश पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार झाले. यंदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होत असली तरी भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यानंतर भारताचे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय झाला. आता इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, आयसीसी ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आलेल्या विदेशी नागरिकांचे अपहरण होण्याची शक्यता पाकिस्तान इंटेलिजेंस ब्युरोने व्यक्त केली आहे. इस्लामिक स्टेट खोरसन प्रांत (ISKP) या संघटनेकडून अपहरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये याआधी चीन आणि अरब नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये याधीच विमानतळ, बंदर, कार्यालये आणि गृह संकुल असलेल्या परिसरात सुरक्षा व्यवस्थ वाढविण्यात आली आहे. अफगाणिस्तान इंटेलिजेंस एजन्सीने आयएसकेपी संघटनेच्या हल्ल्याची पूर्वकल्पना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीएनएन-न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), इसिस आणि बलुचिस्तानमधील काही संघटनांनीही अशाचप्रकारचे हल्ले करू शकते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार पाकिस्तानी सुरक्षा दलांनी भरारी पथके आणि स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला आहे. ज्या संभाव्या ठिकाणांवर हल्ला केला जाऊ शकतो, अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली गेली आहे. लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होत असलेल्या सामन्यांसाठी विदेशी संघाचे खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात येत आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार का दिला?
पाकिस्तानमध्ये सुरक्षिततेला धोका असणे ही नवीन बाब नाही. २००९ साली श्रीलंकेचा संघ पाकिस्तानात गेला असता संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये श्रीलंकन कसोटीपटू आणि आयसीसीचा पंच जखमी झाला होता. त्यानंतर जवळपास एक दशकभर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने झाले नाहीत. या काळात पाकिस्तानने त्यांचे सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळले. २०१९ मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये द्वीपक्षीय सामने खेळण्यास सुरूवात झाली.
१९९६ नंतर पहिल्यांदाच आयसीसीची एखादी स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. १९९६ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत झाली होती. यंदा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे सहा देश पाकिस्तानमध्ये खेळणार आहेत. पण यांच्यातील जो देश उपांत्य फेरीत भारताविरोधात येईल, त्यांचा सामना दुबईत होईल.