सर्जिओ अॅग्युरोने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडवर २-१ असा थरारक विजय मिळवला. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सलग दुसऱ्या विजयासह मँचेस्टर सिटी गुणतालिकेत १२ गुणांच्या फरकासह दुसऱ्या क्रमांकावर असला तरी जेतेपद पटकावण्याच्या त्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मध्यंतरानंतर जेम्स मिलनेरच्या गोलाच्या जोरावर मँचेस्टर सिटीने खाते उघडले. सिटीची आघाडी आठ मिनिटे टिकली. मात्र यानंतर सिटीचा कर्णधार विन्सेंट कॉम्पनीने स्वयंगोल केल्याने युनायटेडच्या नावावर पहिल्या गोलची नोंद झाली. अखेर ७८व्या मिनिटाला अॅग्युरोने शानदार गोल करत मँचेस्टर सिटीला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मँचेस्टर सिटीचे ६५ गुण आहेत, तर ३१ सामन्यांत युनायटेडचे ७७ गुण आहेत. चेल्सी तिसऱ्या स्थानी आहे.