हॉकी इंडियाची इच्छा असेल व त्यांनी योग्य मार्ग काढला तर मी भारतीय हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार आहे, असे माजी प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना कळविले आहे.
‘‘मी रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंत प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार आहे, मात्र हॉकी इंडियाने माझ्यासाठी सन्माननीय तोडगा काढावा, असे वॉल्श यांनी म्हटले आहे. वॉल्श यांनी पर्थ येथून सोनोवाल यांना हे पत्र पाठविले आहे.
दक्षिण कोरियात यंदा झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १६ वर्षांनी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारतात परतल्यानंतर लगेचच वॉल्श यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरण व हॉकी इंडिया यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती, मात्र त्यामधून कोणताही मार्ग न निघाल्यामुळे वॉल्श यांनी राजीनामा मागे घेतला नाही. वॉल्श हे अमेरिकन हॉकी संघाबरोबर असताना तेथे झालेल्या भ्रष्टाचारात त्यांचा मोठा वाटा होता, असा आरोप हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी केला होता. मात्र वॉल्श यांनी हे आरोप फेटाळले होते. हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर असलेले मतभेद हाच वॉल्श यांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. तथापि, सोनोवाल यांनी वॉल्श यांचे खूप कौतुक केल्यामुळे आता हॉकी इंडियापुढेच पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
‘‘सोनोवाल यांच्याप्रमाणेच संघातील खेळाडूंनी मला खूप चांगले सहकार्य केले आहे व जर त्यांनी असाच दृष्टिकोन ठेवला तर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भवितव्य आहे,’’ असे वॉल्श यांनी सांगितले. वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई सुवर्णपदक मिळवत रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला. त्याआधी त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा