भारतीय कर्णधार विराट कोहलीची स्पष्टोक्ती

अ‍ॅडलेड : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील फलंदाजीमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करीत असलेला भारतीय कर्णधार विराट कोहली याने युवा खेळाडूंना स्पष्ट शब्दात पुढील धोक्यांची कल्पना दिली आहे. तुम्ही केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळलात तर तुम्हाला कसोटी क्रिकेटशी जुळवून घेणे अवघड जाईल, अशा शब्दांत विराटने युवा खेळाडूंना सल्ला दिला आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे उद्दिष्ट ठेवल्यास, युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटमध्ये मानसिक स्तरावर बिकट परिस्थितीशी झुंज द्यावी लागेल, असा इशारा कोहलीने दिला. तो म्हणतो, ‘‘मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हणजेच एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० हे प्रकार महत्त्वाचे आहेत. मात्र, केवळ त्यावरच लक्ष केंद्रित केले तर कसोटी क्रिकेटशी जुळवून घेणे त्यांना अशक्य ठरू शकते. दररोज सकाळी लवकर उठून आठवडय़ातील किमान पाच दिवस त्यासाठी सराव करावा लागेल.’’

‘‘भारतीय फलंदाजीची सध्याची फळी उगवत्या खेळाडूंसमोर एक चांगले उदाहरण असून त्यांचे अनुकरण युवा खेळाडूंनी करावे. त्याचा फायदा होतकरू फलंदाजांना निश्चितच होईल. जर भारतीय खेळाडू आणि क्रिकेटरसिकांनी कसोटी क्रिकेटचा आदर केला तर जगात कसोटी क्रिकेट कायमस्वरूपी सर्वोच्च स्थानावर राहील,’’ असेही कोहलीने नमूद केले.

ऑस्ट्रेलियन भूमीतील भारताच्या पहिल्यावहिल्या कसोटी विजयाबद्दल कोहली म्हणाला, ‘‘भारतीय संघाचे ते ध्येय होते, असे म्हणता येणार नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताला महासत्ता बनवण्याचे आमचे उद्दिष्ट असून येत्या काही वर्षांत भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल बनवण्यावर आमचा भर असेल. जगभर भारतीय चाहते पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांनी कसोटी क्रिकेटला पसंती दिली तर नक्कीच आम्ही कसोटीत वरच्या स्थानी असू.’’

Story img Loader