पीटीआय, चेन्नई
अपघातानंतर प्रथमच कसोटीत सहभाग नोंदवणारा ऋषभ पंत (१२८ चेंडूंत १०९ धावा) आणि शुभमन गिल (१७६ चेंडूंत नाबाद ११९ धावा) यांच्या शतकी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर घट्ट पकड मिळवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवावा लागला, तेव्हा विजयासाठी ५१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश अजून ३५७ धावांनी पिछाडीवर होते. भारताने अडीच दिवसाचा खेळ शिल्लक असताना ४ बाद २८७ धावसंख्येवर दुसरा डाव सोडण्याचा आक्रमक निर्णय घेतला. त्यानंतर बांगलादेशची सुरुवात आश्वासक झाली. मात्र, रविचंद्रन अश्विनच्या (३/६३) फिरकी गोलंदाजीने दिवसअखेरीस बांगलादेशला अडचणीत आणले. बांगलादेशची अवस्था ४ बाद १५८ अशी असून, कर्णधार नजमुल हुसैन शांतो (५१) आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन (५) खेळपट्टीवर नाबाद होते.

चेपॉकची खेळपट्टी तिसऱ्या दिवसानंतरही फिरकीला अनुकूल परिस्थिती दिसत नव्हती. चेंडूही फारसा सीम होताना दिसत नव्हता. फलंदाजीसाठी अशा उपयुक्त खेळपट्टीवर भारताने तिसऱ्या दिवशी केवळ ४१ षटकांत २०६ धावांची भर घालून दुसरा डाव सोडण्याचा आक्रमक निर्णय घेतला. मोठ्या विश्रांतीनंतर कमालीच्या आत्मविश्वासाने दुणावलेल्या पंतने शानदार शतकी खेळी करून सर्वांना प्रभावित केले. पंतचे हे सहावे कसोटी शतक ठरले. पंतने आपल्या खेळीत १३ चौकार व चार षटकार लगावले. शुभमन गिलच्या साथीत चौथ्या गड्यासाठी १४७ धावांची भागीदारी केली. पंत बाद झाल्यावर भारताने डाव लांबवण्यात स्वारस्य दाखवले नाही. शुभमन गिलने पहिल्या डावातील अपयश धुऊन टाकताना शैलीदार फलंदाजीने १० चौकार व चार षटकारांच्या साहाय्याने पाचवे शतक साजरे केले.

हेही वाचा >>>Video: हात जोडले, कानही धरले, बॅटची पूजा करुन ऋषभ पंत मैदानात उतरला, देवाकडे काय मागितलं?

अडीच दिवसांत ५१५ धावांचे आव्हान मिळाल्यावर बांगलादेशला झाकिर हसन आणि शादमान इस्लाम यांनी सावध सुरुवात करून दिली. खेळपट्टी सपाट होती. चेंडू बॅटवर अगदी सहज येत होता. वेगवान गोलंदाजांना कष्ट पडत होते. तरी, अश्विनने भारताला सामन्यात परत आणले. क्षेत्ररक्षकांनीही या वेळी सुरेख साथ दिली. बुमराने झाकिरला बाद करून पहिले यश मिळवले. तेव्हा बांगलादेशने ६२ धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र, अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशची फलंदाज चकले आणि त्यांच्या संयमाची कसोटी सुरू झाली. शादमान (३५), मोमिनुल हक (१३) आणि मुश्फिकूर रहीम (१३) असे फलंदाज बाद झाले. आता शांतो आणि शाकिब यांच्या भागीदारीवर बांगलादेश किती काळ तग धरणार हे अवलंबून असेल. तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. आता चौथ्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हवामानही या सामन्यात निर्णायक ठरू शकते.

त्यापूर्वी, पंत आणि गिल या दोघांनी प्रतिआक्रमणासाठी वेगळीच पद्धत अवलंबली. दुसऱ्या दिवशी गोलंदाजीवर आरूढ होणाऱ्या भारतीय पंत, गिल या नाबाद जोडीने तिसऱ्या दिवशी गोलंदाजीचा आदर केला. जवळच्या क्षेत्ररक्षकांची चिंता न करता बचाव भक्कम ठेवला. जेव्हा गोलंदाज आता वर्चस्व राखू पाहत आहे असे वाटल्यावर दोघांनीही आक्रमक खेळ केला. भारताने २०२४ या वर्षात आतापर्यंत ८५ षटकार झळकावले आहेत. संघाकडून एकाच वर्षात सर्वाधिक षटकार मारण्यापासून ते ५ षटकार दूर राहिले. हेच भारताच्या तिसऱ्या दिवसातील ४१ षटकांतील खेळाचे वैशिष्ट्य ठरले.

फिरकीला निष्प्रभ करण्यासाठी पुढे येऊन खेळलो गिल

खेळपट्टीवरील विचित्र प्रकारे चेंडू वळत होते. ज्यामुळे एका क्षणी फिरकीपटूंना चेंडूला उसळी देखिल मिळण्याची शक्यता होती. यासाठी फिरकी गोलंदाजांना निष्प्रभ करण्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा निर्णय घेतला, असे दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिलने सांगितले. ‘‘खेळपट्टीवर प्रत्येक चेंडू वळत नव्हता. पण, एक विचित्रपणे फिरत होता आणि मधूनच उसळी घेत होता. गोलंदाजांसाठी ही खरी गोंधळात टाकणारी परिस्थिती असते आणि म्हणूनच त्यांना आणखी अस्वस्थ करण्यासाठी फलंदाजीत बदल केला,’’ असे गिल म्हणाला.

संक्षिप्त धावफलक :

●भारत (पहिला डाव) : ३७६

●बांगलादेश (पहिला डाव) : १४९

●भारत (दुसरा डाव) : ६४ षटकांत ४ बाद २८७ घोषित (शुभमन गिल नाबाद ११९, ऋषभ पंत १०९; मेहदी हसन मिराज २/१०३)

●बांगलादेश (दुसरा डाव) : ३७.२ षटकांत ४ बाद १५८ ( नजमुल हुसैन शांतो खेळत आहे ५१, शाकिब अल हसन खेळत आहे ५, शादमान इस्लाम ३५, झाकिर हसन ३३; रविचंद्रन अश्विन ३/६३).