कसोटी क्रिकेटमध्ये वेळ अधिक असल्याने गोलंदाजांना परिस्थिती समजण्यास मदत होते, याचा फायदा पुढे एकदिवसीय सामने खेळताना होतो. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक आव्हाने असल्याने प्रभावी गोलंदाजी करताना त्याचा फायदा होतो, असे मत भारतीय संघाचा गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केले. रविवारी जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी शनिवारी कसून सराव केला. सरावादरम्यान उमेश पत्रकारांशी बोलत होता.

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान उमेशला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे कसाटीतून थेट एकदिवसीय सामना खेळण्याबाबत त्याला विचारणा केली असता उमेशने सांगितले की, सतत कसोटी खेळल्याने त्याच क्षमतेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये शंभर टक्के योगदान देणे गोलंदाजांसाठी कठीण असते. त्यामुळे खेळाडूंना आरामाची नितांत गरज असून बीसीसीआयच्या नवीन नियमात याची दखल घेण्यात आली आहे.

कसोटी सामन्यातील आव्हानांमुळे गोलंदाजांना परिस्थितीनुसार भरपूर शिकायला मिळते. माझ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामने समान आहेत. एका विशिष्ट वयानंतर गोलंदाजाला कस लावण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे सर्व प्रकारात क्रिकेट खेळणे माझ्या फायद्याचे आहे. माझ्या मते, सातत्याने क्रिकेट खेळत असलेल्या गोलंदाजांना सरावापेक्षा ‘रिकव्हरी’ची आवश्यकता असते. कारण वेगवान गोलंदाज म्हणून आपण सामने भरपूर खेळू शकतो मात्र ‘फिटनेस’ हळूहळू कमी होत जातो. अशात दुखापतीला सामोरे जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खेळाडूला दोन ते तीन महिने संघातून बाहेरही राहावे लागू शकते. बीसीसीआय आमच्या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आमच्याबाबत योग्य निर्णय घेत आहे, असेही उमेश म्हणाला. मोहम्मद शमी व मी मोठय़ा अंतरानंतर संघात पदार्पण केले. बंगळूरू येथील चौथ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली. मात्र अधिकच्या १५ ते २० धावांमुळे आम्ही अडचणीत आलो. अतिरिक्त धावा रोखण्यात आम्हाला अपयश आले. मात्र वरिष्ठ गोलंदाज म्हणून पराभवाची जबाबदारी आम्हालाच स्वीकारावी लागेल, असेही तो म्हणाला.

दोन्ही संघांचा कसून सराव

उद्या रविवारी होणाऱ्या पाचव्या व शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंनी सराव केला. ऑस्ट्रेलिया संघाकडून सरावासाठी फारसा वेळ देण्यात आला नाही. मात्र भारतीय संघाने जामठ्यावर बराच वेळ घालविला. दरम्यान विराट सेनेने क्षेत्ररक्षणासह फलंदाजी आणि गोलंदाजीवर भर देत घाम गाळला. तब्बल अडीच ते तीन भारतीय संघाने जामठय़ावर सराव केला. मुख्य प्रशिक्षक रवि शात्री यांनी ‘नेट प्रॅक्टिस’ दरम्यान खेळाडूंना अनेक टिप्स दिल्या.

Story img Loader