रणजीपटू घडविणाऱ्या प्रशिक्षकांना अनेक मानसन्मान मिळतात. मात्र दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर आदी अव्वल दर्जाचे कसोटीपटू घडविणारे प्रशिक्षक विठ्ठल ऊर्फ ‘मार्शल’ पाटील यांची अवस्था ‘एक अकेला इस शहर में..’ अशी झाली आहे. म्हातारपणी विचारपूस करायला कोणी नातेवाईक येत नाही किंवा शिष्यही येत नाही अशाच स्थितीत ते जगत आहेत.
पोद्दार महाविद्यालय व दादर युनियन क्लबसारख्या संघांमध्ये पाटील यांनी अनेक उत्तमोत्तम खेळाडूंना क्रिकेटचे बाळकडू दिले. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेले पाटील हे आजपर्यंत उपेक्षितच राहिले. त्यांनी नुकतेच ८६व्या वर्षांत पदार्पण केले. मात्र रोजच्या दिवसाप्रमाणेच हा दिवसही पुढे सरकला. पावसामुळे ओलसर झालेल्या भिंती, धूळ साठलेली जमीन व पोपडे आलेल्या भिंती अशा स्थितीत राहणाऱ्या पाटील यांना साथ आहे ती टेलिव्हीजनची. वृद्धापकाळामुळे अनेक आजार त्यांना जडले आहेत, मात्र त्याची फारशी दखल घ्यायला कोणीही नाही. घराची एक किल्ली शेजाऱ्यांकडे असल्यामुळे तेच अधूनमधून पाटील यांच्या तब्येतीची पाहणी करतात.
दादर पारसी कॉलनीत राहणाऱ्या तेहमुल दहीवाला या त्यांच्या मित्राने एका माळ्यामार्फत त्यांचा ठावठिकाणा शोधून काढून त्यांची नुकतीच भेट घेतली. तेव्हा त्यांची स्थिती पाहून त्यांनाही रडू कोसळले. दहीवाला यांच्याबरोबर ते अजूनही क्रिकेटविषयी भरपूर गप्पागोष्टी करतात. कांगा लीगसारख्या स्पर्धेत सलग २५ षटके टाकणारे पाटील सध्या विपन्नास्वथेत राहतात. दूरध्वनी वाजला तर एखाद्या शिष्याचा फोन असेल म्हणून ते धडपडत फोन घेतात, मात्र मार्केटिंगसंबंधी फोन असल्यामुळे दरवेळी त्यांचा अपेक्षाभंग होतो. एखादा तरी नामवंत शिष्य येऊन आपली विचारपूस करेल, याच आशेवर ते जगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा