पीटीआय, बँकॉक
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केल्यानंतर पीव्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांतसह भारतीय खेळाडूंचे लक्ष्य मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडिमटन (सुपर ५०० दर्जा) स्पर्धेत आपल्या खेळात सातत्य राखण्याचे असेल.सिंधूने गेल्या आठवडय़ात मलेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती, तर श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या दोन्ही खेळाडूंचे लक्ष आता जेतेपद मिळवण्याकडे असेल. दोन ऑलिम्पिक पदकविजेती सिंधू माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचत जेतेपद मिळवण्याच्या जवळ होती. मात्र, तिला अपयश आले. श्रीकांत थॉमस चषकाच्या ऐतिहासिक विजयातही संघर्ष करताना दिसला. जागतिक क्रमवारीत दोन स्थानांच्या घसरणीसह १३व्या स्थानी पोहोचणारी सिंधू थायलंड स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा सामना करेल, तर श्रीकांतचा सामना मलेशिया मास्टर्सची अंतिम फेरी गाठणाऱ्या चीनच्या वेंग होंग यांगशी होईल. एचएस प्रणॉयने यांगला नमवत मलेशियन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.
कामगिरीत सातत्य न राखल्याने जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी घसरण झालेल्या लक्ष्य सेनचा सामना पहिल्या फेरीत चायनीज तैपेइच्या वांग जु वेईशी होईल. ऑर्लिन्स मास्टर्स स्पर्धेतील विजेता प्रियांशु राजावतही या स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. त्याची सुरुवात मलेशियाच्या एन जे योंगशी होईल. मलेशिया मास्टर्स स्पर्धेबाहेर राहणारी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी या आठवडय़ात पुनरागमन करेल. पहिल्या फेरीत त्यांच्यासमोर फ्रान्सच्या लुकास कोर्वी व रोनन लाबरचे आव्हान असेल. पुरुष दुहेरीत कृष्ण प्रसाद गारगा व विष्णुवर्धन गौड पंजाला तसेच, महिला दुहेरीत अश्विनी भट के. आणि शिखा गौतमदेखील सहभाग नोंदवतील.