भारताची आठ पदकांची कमाई
आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशीष कुमारने शनिवारी पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत भारताने आठ पदकांची कमाई केली.
जगातील ३७ देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पध्रेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. अखेरच्या दिवशी माजी कनिष्ठ विश्वविजेती निखात झरीन (५१ किलो), आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेता दीपक (४९ किलो), गीबी बॉक्सिंग स्पध्रेतील रौप्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (५६ किलो) आणि इंडिया खुल्या स्पध्रेतील रौप्यपदक विजेता ब्रिजेश यादव (८१ किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
७५ किलो वजनी गटात आशीषने कोरियाच्या किम जिनजाईचा ५-० असा पराभव केला. इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या आशीषने दोन महिन्यांत आणखी एका पदकाची कमाई केली.
स्ट्रँडजा चषक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखातचा आशियाई क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या चँग युआनपुढे निभाव लागला नाही. चँगने निखातला ५-० अशी धूळ चारली. ५६ किलो गटात थायलंडच्या चाटचाय डेशा बुटडीने हसमुद्दीनचा ५-० असा पराभव केला. ४९ किलो गटात दीपकने उझबेकिस्तानच्या मिर्झाखमेदोव्ह नॉदिजॉनला नमवले. ८१ किलो गटात थायलंडच्या अनावट थाँगक्रॅटॉव्हने ब्रिजेश यादवचा ४-१ असा पाडाव केला.