उत्कंठावर्धक लढतीत ठाणे थंडर्सने मुंबई रायडर्सचा १६-१४ असा पराभव करून गुंता ग्रुप आयोजित पहिल्यावहिल्या खो-खो प्रीमिअर लीगच्या जेतेपदावर नाव कोरले. ठाण्याच्या विजयात कर्णधार विलास करंडे आणि प्रणय राऊळ यांचे संरक्षण तसेच उत्तम सावंत आणि रंजन शेट्टी यांनी चार बळी मिळवत मोलाचा वाटा उचलला. मुंबई रायडर्सच्या सुनील मोरे, मनोज पवार, मिलिंद चावरेकर आणि सुरेश सावंत यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण संघाचा पराभव ते टाळू शकले नाहीत.
ठाणे थंडर्सने प्रतिस्पध्र्याचा सुरुवातीला चांगला पाठलाग केला. पण सुनील मोरे आणि मनोज पवार यांनी दोन मिनिटांच्या वर संरक्षण केल्याने ठाण्याला सात बळी मिळवता आले. मात्र ठाण्याने दुसऱ्या डावात अत्यंत योजनाबद्ध आणि वेगवान खेळ करत आघाडी वाढवली. अडीच मिनिटांचा खेळ बाकी असताना मुंबईची दाणादाण उडणार होती. पण सुरेश सावंतने २.१० मिनिटे किल्ला लढवून मुंबईचे आव्हान कायम राखले. विजयासाठी १० बळींचे आव्हान मुंबईला पेलवले नाही. विलास करंडेने दोन मिनिटे संरक्षण तसेच प्रणय राऊळने चिकाटीने खेळ करत मुंबईला विजयाची संधी दिली नाही.

Story img Loader