ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने पुरुष गटात, तर शिवभक्त क्रीडा संघ व नाईक विद्यामंदिर यांनी महिला गटात बाद फेरीत स्थान मिळविले आणि महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत वर्चस्व कायम राखले.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नाईक विद्यामंदिर संघाने साखरवाडी संघाचा १५-९ असा पराभव केला. पूर्वार्धात ८-५ अशी आघाडी घेणाऱ्या नाईक संघाकडून प्रणाली मगर (नाबाद १ मि.१० सेकंद व साडेतीन मिनिटे), शीतल भोर (२ मि. १० सेकंद), रुपाली बडे (१ मि.४० सेकंद व अडीच मिनिटे) मृणाल कांबळे (१ मि.४० सेकंद) व ४ गडी), शुभांगी एरंडे (४ गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. साखरवाडी संघाकडून राष्ट्रीय खेळाडू प्रियंका येळे (१ मि.२० सेकंद व तीन मिनिटे), प्रीति डांगे (२ मि.५० सेकंद व १ मि.२० सेकंद), करिश्मा नागरजी (२ मिनिटे व ४ गडी) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. शिवभक्त संघाने रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाचा १७-७ असा दणदणीत पराभव केला. मीनल भोईर हिने दहा गडी बाद करीत शिवभक्त संघाकडून महत्त्वाची कामगिरी केली. कविता घाणेकर (२ मि.२० सेकंद व २ मिनिटे) व प्रियंका भोपी (नाबाद ४ मि.२० सेकंद व २ गडी) यांनी तिला चांगली साथ दिली. नरसिंह संघाच्या सपना जाधव (२ मि.४० सेकंद व १ मि.१० सेकंद), ऋतुजा वाघ (नाबाद दीड मिनिटे व २ गडी), सोनम तळेकर (दीड मिनिटे व २ गडी) यांची लढत उल्लेखनीय होती.
पुरुष गटात विहंग मंडळाने नाशिकच्या संस्कृती क्रीडा मंडळाचा १३-११ असा दोन गुण व पावणे आठ मिनिटे बाकी राखून पराभव केला. पूर्वार्धात ११-६ अशी आघाडी घेणाऱ्या विहंग संघाकडून अमित पवार (दीड मिनिटे व १ मि.५० सेकंद), महेश शिंदे (२ मि.२० सेकंद व ४ गडी), अभिषेक परब (१ मि.२० सेकंद व १ मि.४० सेकंद) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. नाशिक संघाच्या दीपक लभडे (१ मि.२० सेकंद व २ गडी) व स्वप्नील चिकणे (१ मिनिट व २ गडी) यांनी चमक दाखविली.
मुंबई उपनगरच्या गांधी स्पोर्ट्स संघानेही बाद फेरी निश्चित केली. त्यांनी पुण्याच्या ईगल्स संघावर ११-९ असा एक डाव दोन गुणांनी विजय नोंदविला. त्याचे श्रेय दीपक मोरे (४ मिनिटे व २ गडी), अभिजित जाधव (२ मि.५० सेकंद व ४ गडी) यांच्या अष्टपैलू खेळास द्यावे लागेल. त्यांना सचिन साळुंके (१ मि ५ सेकंद व १ मि.५० सेकंद), राहुल साळुंके (३ गडी) यांची योग्य साथ लाभली. मुंबईच्या सरस्वती क्रीडा मंडळाने उस्मानाबादच्या छत्रपती क्रीडा मंडळाचा १३-११ असा साडेपाच मिनिटे बाकी राखून पराभव केला. अहमदनगरच्या एकलव्य संघाने समर्थ व्यायाम मंदिरास ११-९ असे हरविले. त्या वेळी पूर्वार्धात ५-५ अशी बरोबरी होती. स्पर्धेतील बाद फेरीचे सामने बुधवारी सकाळी सात वाजता होणार आहेत.
महापौर चषक खो-खो : ठाण्याचे तीन संघ बाद फेरीत
ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने पुरुष गटात, तर शिवभक्त क्रीडा संघ व नाईक विद्यामंदिर यांनी महिला गटात बाद फेरीत स्थान मिळविले आणि महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत वर्चस्व कायम राखले.
आणखी वाचा
First published on: 24-12-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane three teams in knockout round of mayor kho kho cup