नवतरुण क्रीडा व सामाजिक विकास मंडळ, कारवी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत ठाणे जिल्ह्य़ाच्या शिवशंकर क्रीडा मंडळाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मुंबई शहरच्या विजय नवनाथ संघावर ९-८ असा निसटता विजय मिळवला. रायगडच्या नवजीवन संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
शिवशंकर आणि विजय नवनाथ यांच्यात झालेला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. पूर्वार्धात हा सामना ३-३ असा बारोबरीत होता. सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना विजय नवनाथ संघाकडे ७-५ अशी आघाडी होती. शिवशंकरच्या सुनील शिवथरकरने एका चढाईत तीन गडी बाद करून आपल्या संघाला ८-७ अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनतर विजय नवनाथच्या चढाईपटूची पकड झाल्यामुळे शिवशंकरकडे ९-७ अशी आघाडी आली. अखेर हा सामना शिवशंकरने ९-८ असा जिंकून विजेतेपद पटकावले. शिवशंकरचे नीलेश साळुंखे व योगेश सुर्वे यांच्या चढायांना अॅलन डिसुझाच्या पकडीची साथ मिळाली. विजय नवनाथचे विलास कदम, मयूर खामकर, विशाल माने चमकले.
शिवशंकरच्या नीलेश साळुंखेला स्पध्रेतील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. विजय नवनाथच्या विशाल मानेला उत्कृष्ट पकडपटू तर नवजीवनच्या नीलेश पाटीलला उत्कृष्ट चढाईपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत विजय नवनाथ संघाने मुंबई शहरच्या विजय क्लबवर १३-३ अशी मात केली. या सामन्यात विजय नवनाथचे विलास कदम, मयूर खामकर, विशाल माने छान खेळले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवशंकर संघाने रायगडच्या नवजीवन संघावर ९-७ अशी मात केली. या सामन्यात शिवशंकरचे नीलेश साळुंखे, सिद्धेश जळगावकर, सूरज बनसोडे चमकले. नवजीवनचे नीलेश पाटील, सूरज पाटील व राकेश म्हात्रे यांनी चांगला खेळ केला.