दिपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी त्यांच्या नाबाद ६८ धावांच्या भागीदारीसह उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने संस्मरणीय पदार्पण केले. याच जोरावर भारताने मंगळवारी पहिल्या टी२० सामन्यात श्रीलंकेवर दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. याच कामगिरीमुळे दिपक हुडा ला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवोदित वेगवान गोलंदाज शिवम मावीने चार विकेट्ससह प्रेरणादायी गोलंदाजी कामगिरी करत भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचा बहुमान मिळवला. शिवम माविने ४ षटकात २२ धावा देत ४ गडी बाद केले. पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत त्याने अनेक विक्रम रचले. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांची फारशी साथ लाभली नाही.
चहल आणि पटेल हे दोघेही आता आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहेत. युझवेन्द्र चहल ने २ षटकात तब्बल २६ धावा दिल्या मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नाही. हर्षल पटेल ने २ गडी जरी बाद केले असले तरी त्याने ४ षटकात तब्बल ४१ धावा दिल्या. लंकेला विजय मिळवून देण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चाहत्यांनी मात्र पटेल आणि चहल यांची खिल्ली उडवली.
भारताला १३ धावांचा बचाव करणे आवश्यक असल्याने पंड्याने अंतिम षटक अक्षर पटेलला देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यावेळेस तो म्हणाला “आम्ही इकडे-तिकडे गेम गमावू शकतो पण ते ठीक आहे. या तरुणांनीच आम्हाला खेळात परत आणले.” पुढे जाऊन, भारताचा नवा टी२० कर्णधार हार्दिक पंड्या आपला संघ कठीण परिस्थितीचा कसा सामना करतो हे पाहण्यास उत्सुक आहे कारण सध्या भारतीय संघाला जागतिक स्पर्धांमध्ये फारशी चमक दाखवता येत नसल्याचे त्याने बोलून दाखवले. जागतिक स्तरावर मोठे यश मिळवण्यासाठी कर्णधार हार्दिक संघ सर्वतोपरी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.