Shane Bond on Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर कसोटी चषकाच्या पाचव्या कसोटीदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. पाचव्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये काही काळ त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये दुखापत वाढल्यामुळे जसप्रीत बुमराहला गोलदांजी करता आली नव्हती. पाठीत दुखापत झाल्यानंतर त्याला काही दिवसांपूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्राफीलाही मुकावे लागले.
मागच्या काही वर्षांमध्ये बुमराहच्या क्रिकेट कारकिर्दीला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. २०२२-२३ मध्येही दुखापतीमुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर बसावे लागले होते. २०२३ साली बुमराहने पुनरागमन करत एकदिवसीय विश्वचषकात भाग घेतला होता. जसप्रीत बुमराहने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या त्याच्या पुनरागमनाची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यंदाचा आयपीएल हंगामातही सुरुवातीचे काही सामने बुमराह खेळू शकणार नसल्याचे सांगितले जाते.
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू, वेगवान गोलंदाज शेन बॉन्डने बुमराहच्या दुखापतीबद्दल मोठे भाष्य केले आहे. शेन बॉन्डची कारकिर्दही दुखापतीमुळे संपली होती. त्यामुळे वेगवान गोलंदाजाची दुखापत किती गंभीर ठरू शकते, याबाबत त्याने भाष्य केले आहे. बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्याच जागी पुन्हा दुखापत झाल्यास बुमराहची कारकिर्द संपू शकते, असे शेन बॉन्डने म्हटले आहे. शेन बॉन्डने पुढे म्हटले की, आता वेळ आली आहे. भारताच्या टॉप मॅनेजमेंटने बुमराहवरील ताण कमी केला पाहिजे.
बॉन्डच्या मतानुसार, बुमराह जेव्हा कसोटी क्रिकेट खेळून लगेच टी-२० खेळण्यासाठी उतरतो, तेव्हा खरी अडचण निर्माण होते. याच कारणामुळे त्याला बुमराहच्या भविष्याची चिंता वाटते. आयपीएलचा १८ वा हंगाम २२ मार्च पासून सुरू होत आहे. बुमराह मुंबई इंडियन्स संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.
शेन बॉन्डने पुढे म्हटले की, बुमराह आता ठिक आहे. पण हे शेवटी त्याच्यावरील कामाच्या ताणावर अवलंबून आहे. मी तर हेच म्हणेन की, क्रिकेट बोर्डाने त्याच्यावरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करायला हवे. वर्षभरात असलेल्या सीरीज पाहून त्याला अधूनमधून विश्रांती द्यायला हवी. त्याला विश्रांती देण्याचा निर्णय बोर्डाने घ्यायला हवा. बुमराहचा विचार करून बोर्डाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. एका सीरीज नंतर तात्काळ दुसऱ्या सीरिजला त्याला उतरवून जोखीम घेण्याची आवश्यकता नाही.
इंग्लंडमध्ये भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. माझ्या मताप्रमाणे बुमराहने तिथे दोनच कसोटी सामने खेळायला हवेत. आयपीएलनंतर लगेचच पाच कसोटी सामने खेळणे धोक्याचे असू शकते, असेही बॉन्डने म्हटले आहे. बॉन्डने मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याकाळात त्याला बुमराहबरोबर मैदानात वेळ घालवता आला होता.