MUM vs MP Ranji Trophy final : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. देशांतर्ग क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश एकमेकांशी दोन हात करत आहेत. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णय पुनरावलोकन प्रणाली अर्थात डीआरएस नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डीआरएस प्रणालीचा वापर होतो. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमधील सर्व सामन्यांमध्येही ही प्रणाली वापरली जाते. असे असताना देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजीमध्ये ही प्रणाली का वापरली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या रणजी करंडकातील अंतिम सामन्यात मुंबईचा फलंदाज सर्फराज खानला जीवनदान मिळाले. मध्य प्रदेशचा गोलंदाज गौरव यादवने खान पायचित असल्याचे अपील केले होते. मात्र, मैदानावरील पंचांनी खान नाबाद असल्याचा निर्णय दिला. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्यामते तर आजच्या सामन्यात डीआरएस प्रणाली असती तर कदाचित सर्फराज खानला जीवनदान मिळाले नसते. या गोष्टीचा सामन्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आमचा आमच्या पंचांवर विश्वास आहे,’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. “डीआरएस वापरण्याची प्रक्रिया खर्चिक आहे. रणजीच्या अंतिम सामन्यात के. एन. अनंतपद्मनाभन आणि वीरेंद्र शर्मा हे भारतातील दोन सर्वोत्तम पंच मैदानात आहेत,” असेही हा अधिकारी म्हणाला.
रणजीमध्ये डीआरएस न वापरण्यासाठी खर्चाचे कारण दिले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयकडे पैशांची करमतरता आहे, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याच बीसीसीआयला नुकतेच आयपीएलच्या माध्यम हक्कांमधून ४८ हजार ३९० कोटी रुपये मिळाले आहेत.