पीटीआय, नवी दिल्ली
उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांच्या फळीमुळे आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी व्यक्त केले. तसेच जायबंदी जसप्रीत बुमरा आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा फटका बसेल, असेही चॅपल यांना वाटते.
‘डब्ल्यूटीसी’चा अंतिम सामना
७ ते ११ जून या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. पंत, बुमरा यांच्यासह श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे भारतीय खेळाडूही दुखापतींमुळे या सामन्याला मुकणार आहेत.‘‘बुमरा आणि पंत यांच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा फटका बसेल. हे दोघे उपलब्ध असल्यास भारतीय संघाचे सामन्यात पारडे जड असते. तसेच अष्टपैलू हार्दिक पंडय़ा कसोटी क्रिकेट खेळत नसल्याचे मला आश्चर्य वाटते. त्याच्यासारख्या खेळाडूचा भारताला नक्कीच फायदा झाला असता,’’ असे चॅपल यांनी नमूद केले.
ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट आहे. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असेल. ते कोणत्याही परिस्थितीत चांगली गोलंदाजी करू शकतात, पण जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना अधिकच मदत मिळते. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. भारताकडेही उत्तम गोलंदाज आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमधील फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागेल. – इयन चॅपल